साखरेची उसळी कायम; द्राक्षांची एंट्री
By Admin | Updated: January 11, 2016 01:08 IST2016-01-11T00:54:16+5:302016-01-11T01:08:29+5:30
आठवडी बाजार : साखर प्रतिकिलो ३४ रुपये; संत्री, बोरांची आवक वाढली

साखरेची उसळी कायम; द्राक्षांची एंट्री
कोल्हापूर : गेल्या पंधरा-वीस दिवसांत साखरेच्या दराने चांगलीच उसळी घेतली असून, किरकोळ बाजारात ३४ रुपये किलोपर्यंत दर पोहोचले आहेत. थंडी व मार्गशीर्ष महिन्याचा शेवट यामुळे फळ मार्केट थंड असून द्राक्षे, संत्री व बोरांची आवक कमालीची वाढली आहे. फळभाज्यांच्या दरात चढ-उतार असले, तरी पालेभाज्यांच्या दरात गतआठवड्याच्या तुलनेत घट झाली आहे.
साखर निर्यातीच्या निर्णयाचा परिणाम बाजारपेठेवर दिसत असून, दिवसेंदिवस साखरेच्या दरात वाढ होत आहे. किरकोळ बाजारात ३४ रुपयांपर्यंत साखरेचा दर झाला आहे. सरकी तेलाबरोबरच हरभरा डाळ, तूरडाळ, मूगडाळ, मूग, मसूरचे दर स्थिर आहेत. तीळ, खोबरे, जिरे, धण्याच्या दरात फारशी चढ-उतार झाली नसून शाबू ५० रुपयांच्या खाली आली आहे. तांबडी मिरचीची मागणी सुरू झाली असून, अजून मागणीत वाढ नसल्याने दर ‘जैसे थे’ आहेत.
फळ मार्केटमध्ये सध्या संत्री, बोरांची रेलचेल दिसते. अमरावतीहून संत्र्यांची आवक जोरात असून, घाऊक बाजारात १० ते १४ रुपये किलोचा दर राहिला आहे. गेल्या चार दिवसांत थंडीत थोडी वाढ झाली आहे. त्यातच मार्गशीर्ष महिना संपल्याने फळांच्या मागणीवर परिणाम दिसत आहे. मोसंबी, माल्टा, चिकू, सफरचंद, डाळींब या फळांच्या दरात फारसा चढ-उतार दिसत नाही. बाजार समितीत बोरांची आवक दिवसाला सरासरी पाचशे पोत्यांची आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो आठ रुपये दर राहिला आहे. द्राक्षांची रोज साडेआठशे बॉक्सची आवक सुरू झाली असून, सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आवक आहे. येत्या आठ दिवसांत आवकेत वाढ होईल, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. कलिंगडे, अंजीर, केळी, रामफळ, स्ट्रॉबेरीची आवक स्थिर आहे.
भाजीपाला मार्केट काहीसे अस्थिर दिसत आहे. प्रमुख भाज्यांच्या दरात चढ-उतार होत आहे. वांगी, टोमॅटो, ढब्बू, फ्लॉवर या भाज्यांच्या दरात घसरण झाली असून भेंडी, वरणाच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात वांगी २७ रुपये, टोमॅटो १५ रुपये, ढब्बू २८ रुपये दर आहे. उर्वरित भाज्यांचे दर स्थिर आहेत. कोथिंबीरचे दरही तेजीत असून, आठ रुपये पेंडी आहे.
गुळाची पुन्हा घसरण!
गुळाची आवक वाढू लागली तरी दरात पुन्हा घसरण होऊ लागली आहे. पाच, दहा व तीस किलो गूळरव्यांच्या दरात प्रतिक्विंटल १५० ते एक किलो बॉक्सच्या दरात प्रतिक्विंटल दोनशे रुपये दर खाली आला आहे.
लसणाचा दिलासा
गेले पंधरा ते वीस दिवस लसणाने दीडशे रुपयांचा टप्पा पार केला होता. या आठवड्यात घाऊक बाजारात तो प्रतिकिलो १३० रुपयांपर्यंत खाली आला आहे. विशेष म्हणजे लसणाची आवक कमी असूनही दरात घसरण झाली असून, बटाट्याचे दर मात्र स्थिर आहेत. कांद्याच्या दर तुलनेने थोडे कमी झाले आहेत.