साखर महागणार, सणवारात घास कसा गोड लागणार..; किती रुपयांवर गेला दर.. जाणून घ्या

By राजाराम लोंढे | Updated: August 13, 2025 16:55 IST2025-08-13T16:55:19+5:302025-08-13T16:55:53+5:30

दिवाळीपर्यंत आणखी वाढ?

Sugar prices increased during the festive period | साखर महागणार, सणवारात घास कसा गोड लागणार..; किती रुपयांवर गेला दर.. जाणून घ्या

साखर महागणार, सणवारात घास कसा गोड लागणार..; किती रुपयांवर गेला दर.. जाणून घ्या

राजाराम लोंढे

कोल्हापूर : मागील हंगामात साखरेचे घटलेले उत्पादन, केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्याचा कमी केलेला कोटा आणि सणासुदीच्या कालावधीमुळे देशांतर्गत बाजारपेठेत साखरेने उच्चांकी उसळी घेतली आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात घाऊक बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ३८०० रुपये भाव होता, आता ४२५० रुपये झाला आहे. सध्या किरकोळ बाजारात मोठी साखर ४४ रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे.

साखर कारखान्यांच्या मागील गळीत हंगामात गाळपाचे गणित बिघडले. साखर उत्पादनाचा अंदाज फसला आणि उत्पादन कमी झाले. त्याचा परिणाम सध्या बाजारपेठेत दिसत आहे. त्यात केंद्र सरकारने १० लाख टन निर्यातीचा कोटा दिला आहे; पण आतापर्यंत त्यातील साडेसात लाख टनच निर्यात झाला आहे. साखरेचे घटलेले उत्पादन पाहता गेल्यावर्षीच्या तुलनेत सरकारने साखर कारखान्यांना दिलेला कोटा ५० हजार क्विंटलने कमी केला आहे.

ब्राझीलची साखर आंतरराष्ट्रीय बाजारात

ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन वाढले आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर दिसत आहे. तिथे प्रतिक्विंटल ३९०० रुपये दर आहे. त्यापेक्षा देशांतर्गत बाजारपेठेत दर चांगले असल्याने निर्यातीकडे कारखान्यांनी कानाडोळा केल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दिवाळीपर्यंत आणखी दोन-अडीच रुपयांची वाढ?

आगामी काळात गणेशोत्सव, दसरा, दिवाळी हे सण पाठोपाठ आहेत. या सणापूर्वीच किरकोळ बाजारात ४४ रुपये किलो साखर आहे. दिवाळीपर्यंत किलो मागे दोन ते अडीच रुपयांची आणखी वाढ होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

कारखान्यांकडून होत असलेली तुलनात्मक साखर विक्री

महिना -  एस-१ - एस-२ - एम

ऑगस्ट २०२४  - ३६४० - ३६३० - ३८००
ऑगस्ट २०२५ - ४२५० - ४२३० - ४१८०

साखरेचे उत्पादन कमी आणि मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. सणासुदीमुळे थोडी वाढ दिसते, हंगामाच्या तोंडावर त्यात फार वाढ होईल, असे वाटत नाही. - पी. जी. मेढे, साखर उद्योगातील तज्ज्ञ

Web Title: Sugar prices increased during the festive period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.