साखरेच्या दरात ९०० रुपयांनी वाढ
By Admin | Updated: October 20, 2015 21:04 IST2015-10-20T21:02:15+5:302015-10-20T21:04:08+5:30
कारखानदारांपेक्षा व्यापाऱ्यांकडे जास्त साठा : दसरा, दिवाळीमुळे दरवाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत

साखरेच्या दरात ९०० रुपयांनी वाढ
प्रकाश पाटील-- कोपार्डे -आॅगस्टमध्ये १९०० रुपयांपर्यंत घसरलेल्या साखरेच्या दरातील घसरण थांबली असून, केवळ दोन महिन्यांत प्रतिक्विंटल ८०० ते ९०० रुपये वाढ झाली आहे. सध्या साखरेचे दर एक्स फॅक्टरी २८०० रुपये प्रतिक्ंिवटल पोहोचले असून, दसरा, दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाल्याची शक्यता असल्याचे मत साखर उद्योगातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हंगाम २०१४-१५च्या सुरुवातीला साखरेचे दर ३१०० ते ३२०० रुपये प्रतिक्ंिवटल असतानाही कारखानादारांनी एफ.आर.पी.प्रमाणे दर देण्यास चालढकल केली होती; पण शासनानेच एफ.आर.पी. न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचा बडगा उचलताच कारखानदारांनी एफआरपी जाहीर करण्यास सुरुवात केली. मात्र, हा ३१०० रुपये प्रतिक्विंटल दर उत्पादन खर्चाचा मेळ घालण्याइतपत होता. त्यामुळे कारखानदारांनी एफआरपीचे धाडस केले. मात्र, यानंतर साखर दराची घसरण सुरू झाली. ती आॅगस्ट २०१५ पर्यंत सुरू राहिली. आॅगस्ट २०१५ मध्ये साखरेचे दर १९०० रुपयांवर आल्यानंतर साखर कारखानदारांचे धाबे दणाणले. कोल्हापूर विभागातील ३४ साखर कारखान्यांकडे हंगाम २०१४-१५च्या शेवटच्या टप्प्यांतील ८५० कोटी रुपये थकले होते. केंद्र शासनाने बिनव्याजी कर्जाची मदत केल्यानंतरच शेतकऱ्यांची देणी देता आली. साखर उद्योगापुढील अडचणींचा पाढा माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे वाचल्यामुळेच बिनव्याजी कर्जाच्या पॅकेजबरोबर ४० लाख टन साखर निर्यात व साखरेचा बफर स्टॉक करण्याचे सूतोवाच करताच आॅगस्ट २०१५पासून साखर दराच्या घसरणीला ब्रेक लागला आहे. १९०० रुपये प्रतिक्विंटल घसरलेले दर वाढायला सुरुवात झाली आहे.
दरवाढीने दिलासा
केवळ दोन महिन्यांत साखरेच्या दरात प्रतिक्विंटल ७०० ते ८०० रुपये वाढ झाली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता साखर उद्योगातून व्यक्त करण्यात येत आहे. दसरा, दिवाळीच्या सणादरम्यान साखरेचे दर ३१०० ते ३५०० च्या दरम्यान जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळेच एफ.आर.पी.वरून हंगाम २०१५-१६ च्या सुरुवातीला संघटना, कारखानदार व शासन असा त्रिकोणी संघर्ष निर्माण झाला असता. मात्र, साखरेच्या दरवाढीने साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे.
हंगाम २०१४-१५ मध्ये साखरेच्या दरातील घसरणीचा आलेख (प्रतिक्ंिवटल रुपयांत)
आॅक्टोबर२०१४ - ३१०० ते ३२००
डिसेंबर२०१४ - २८०० ते २८५०
जानेवारी२०१५ - २७५०
फेबु्रवारी२०१५ - २६५०
मार्च२०१५ - २५००
एप्रिल२०१५ - २४००
मे२०१५ - २३००
जून२०१५ - २२५०
जुलै२०१५ - २१००
आॅगस्ट२०१५ - १९०५
सप्टेंबर२०१५ - २३००
आॅक्टोबर२०१५ - २७०० ते २८००