महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

By Admin | Updated: March 9, 2017 18:55 IST2017-03-09T18:55:32+5:302017-03-09T18:55:32+5:30

संतप्त कर्मचाऱ्यांचा रस्ता रोको : काम बंद : नगरसेवकांची मध्यस्थी

Suffering the municipal workers severely | महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

गंगावेश येथे अतिक्रमण काढताना घडला प्रकार

संतप्त कर्मचाऱ्यांचा रस्ता रोको : काम बंद : नगरसेवकांची मध्यस्थी
कोल्हापूर : शहरातील गंगावेश परिसरात अतिक्रमणे काढायला गेलेल्या महानगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना नागरिकांनी बेदम मारहाण केली. यावेळी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली. अनपेक्षित घडलेल्या प्रकारानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी संबंधितांवर पोलिस कारवाई करावी, या मागणीसाठी ‘काम बंद’ ठेऊन रास्ता रोको केला; परंतु पोलिसांपर्यंत हे प्रकरण जाऊ नये म्हणून काही नगरसेवकांनी मध्यस्थी करून मारहाण करण्याऱ्यांना माफी मागायला भाग पाडले.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयातर्फे गुरुवारी सकाळी पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळावेस परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली होती. गंगावेश येथे किशोर आयरेकर यांच्या मालकीच्या बाबा वडा सेंटरच्या दुकानाचे पत्र्याचे शेड पाच ते सहा फुटांनी रस्त्यावर आले होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर आलेले वाढीव बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केली. त्यावेळी तेथील काही नागरिकांनी त्यास अटकाव केला. आम्ही शेड उतरून घेतो, मुदत द्या अशी त्यांनी विनंती केली; पण कर्मचाऱ्यांनी त्यांचे काही एक न ऐकता कारवाई सुरू केली.
जेसीबी पुढे घालत पत्र्याचे शेड पाडले. त्याबरोबरच या दुकानाचे शटरसुद्धा खाली आले. त्यामुळे संतप्त झालेल्या आयरेकर कुटुंबीयांसह शेजारील नागरिकांनी जेसीबी चालक शंकर गामा मराडे यास खाली खेचून बेदम मारहाण केली. सोडवायला गेलेल्या उमेश वसंतराव मोहिते यांनाही त्यांनी जोरात मारहाण केली तर कनिष्ठ अभियंता रमेश कांबळे यांना अश्लील शिवीगाळ करून त्यांना अपमानित करण्यात आले. अनपेक्षित घडलेल्या या प्रकाराने कर्मचारी गोंधळून गेले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती कळविली. त्यावेळी सहायक आयुक्त सचिन खाडे, संजय भोसले, नगरअभियंता नेत्रदीप सरनोबत त्याठिकाणी पोहोचले.
तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी गंगावेशीतच ‘काम बंद’ ठेऊन रस्ता रोको आंदोलन सुरू केले होते. सहाय्यक आयुक्त खाडे व नेत्रदीप सरनोबत यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण झालेली असून अश्लील शिवीगाळही करण्यात आली असून आधी मारहाण करणाऱ्यांवर पोलिस कारवाई झाली पाहिजे, असा आग्रह धरला. रस्ता रोको सुरू असतानाच विरोधी पक्षनेते किरण शिराळे, नगरसेवक शेखर कुसाळे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी तेथे आले. सुरुवातीस त्यांनी कर्मचाऱ्यांची बाजू घेण्याऐवजी दुकानमालकाचीच बाजू घेतली. त्यामुळे कर्मचारी अधिकच संतप्त झाले.
------------------------------------------------------
पदाधिकारी, नगरसेवकांची मध्यस्थी
विरोधी पक्षनेते किरण शिराळे, नगरसेवक शेखर कुसाळे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांनी कर्मचाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आयरेकर यांना ‘शेड उतरण्यासाठी अवधी द्या, ते उतरून घेतील’ असेही त्यांनी सांगितले; पण कर्मचारी आधी त्यांच्यावर पोलिस कारवाई झाली पाहिजे, असा आग्रह धरत होते. त्यावेळी गवंडी यांनी ‘तुम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंद करणार, मग ते तुमच्यावर गुन्हा नोंद करणार’ त्यातून वाद वाढत जाईल तेव्हा कारवाईचा विषय लांबवू नका शेड ते स्वत: उतरून घेत आहेत, असे सांगितले. त्यात सहायक आयुक्त खाडे, भोसले यांनीही कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा विषय फारसा गांभीर्याने घेतला नाही. त्यावेळी कर्मचारी नाराज झाले. ‘अतिक्रमण काढा म्हणून तुम्हीच सांगता आणि आता मारहाण झाल्यावर परत तुम्हीच विषय सोडून द्या, असे म्हणता हे बरोबर नाही,’ अशा शब्दांत कर्मचाऱ्यांनी नाराजी बोलून दाखविली. अधिकाऱ्यांनाही त्यांनी खडसावले. आमच्या मागे कोणीच उभे राहणार नसेल तर मग कारवाई तरी का करावी? अशा हताश भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
-------------------------------------------------------
घटनास्थळी गर्दी, तणाव
अतिक्रमण काढतेवेळी झालेल्या मारहाणीवेळी अचानक कर्मचाऱ्यांना ‘काम बंद’ करून रस्ता रोको केला. त्यामुळे तेथे बघ्यांची गर्दी जमली. वाहतूकही विस्कळीत झाली. वातावरण तणावपूर्ण बनले नंतर पोलिस कुमक मागविण्यात आली; परंतु झालेल्या मारहाणीबाबत पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला नाही.

Web Title: Suffering the municipal workers severely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.