शाहू उद्यान मार्केटमध्ये आयुक्तांची अचानक झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:58 IST2020-02-17T15:56:45+5:302020-02-17T15:58:31+5:30
शाहू उद्यान मार्केटमध्ये आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अचानक विक्रेत्यांची झाडाझडती घेतली. विशेष म्हणजे एकाही विके्रत्याकडे प्लास्टिक आढळून आले नाही.महापालिकेच्या आयुक्तपदावर रुजू झाल्यापासूनच डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे.

शाहू उद्यान मार्केटमध्ये आयुक्तांची अचानक झाडाझडती
कोल्हापूर : शाहू उद्यान मार्केटमध्ये आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अचानक विक्रेत्यांची झाडाझडती घेतली. प्लास्टिकचा वापर होतो का, याची तपासणी केली. विशेष म्हणजे एकाही विके्रत्याकडे प्लास्टिक आढळून आले नाही.
महापालिकेच्या आयुक्तपदावर रुजू झाल्यापासूनच डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. दर रविवारी स्वच्छता माहीम राबविली जाते. तसेच प्लास्टिकमुक्त कोल्हापूर करण्याचाही त्यांचा निर्धार आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
शहरामध्ये नागरिकांकडून प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी होत आहे की नाही याच्या तपासणीसाठी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी रविवारी अचानक शाहू उद्यान मार्केट परिसरातील भाजी विके्रते, दुकानदारांची तपासणी केली. यावेळी विके्रत्यांकडे प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशव्या आढळल्या. तसेच चहा देणारा चहावाला कागदी किंवा प्लास्टिक कपांऐवजी काचेच्या कपांतून चहा देत असल्याचे आढळले.
सुट्टीदिवशी काम करणारे पहिले आयुक्त
कोल्हापूर महापालिकेने कडक शिस्त, प्रशासनावर वचक असणारे आयुक्त पाहिले आहेत. आठवड्याची सुट्टी न घेता कामावर हजर राहणारे कलशेट्टी हे पहिले आयुक्त आहेत. प्रत्येक रविवारी ते कामात व्यस्त असतात. रविवारीही त्यांनी सकाळी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होत शाहू उद्यानमध्ये तपासणी केली.