सुभद्रा लोकल एरिया बँकेचे मुख्य कार्यालयाचे काम पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:15 IST2021-01-08T05:15:55+5:302021-01-08T05:15:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत असल्याची ‘ले ऑफ नोटीस’ बजावल्यावरून सुभद्रा लोकल एरियाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी ...

सुभद्रा लोकल एरिया बँकेचे मुख्य कार्यालयाचे काम पाडले बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत असल्याची ‘ले ऑफ नोटीस’ बजावल्यावरून सुभद्रा लोकल एरियाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जेम्स स्टोन येथील मुख्य कार्यालयाचे काम बंद पाडले. नोटीस मागे घेत नाही तोपर्यंत शाखा सुरू होऊ देणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेत काम बंद ठेवून दिवसभर ठिय्या मारला. प्रभारी व्यवस्थापकीय संचालक जय जिंगर यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
सुभद्रा लोकल एरिया बँक ही देशातील एकमेव लोकल एरिया बँक आहे. उद्योजक आर. एम. मोहिते यांच्या ताब्यात ही बँक होती. २०१६ मध्ये त्यांनी मुंबईचे हिरे व्यापारी ग्रुप असलेल्या कोठारीया ग्रुपला बँक दिली. त्यांनी येथे नवीन व्यवस्थापन नेमले. दरम्यान, जुने कर्मचारी बँकेच्या स्थापनेपासून काम करत आहेत. त्यांचा पगारवाढ अपेक्षित झाली नाही. मात्र, गल्लेलठ्ठ पगार देऊन नवीन भरती केली. २४ डिसेंबर २०२० रोजी ठेवीदारांच्या हिताविरोधात काम करत असल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँकेने सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द केला. यामुळे येथील व्यवस्थापानचे सर्व अधिकार संपुष्टात आले. असे असतानाही व्यवस्थापनाने अचानक सोमवारी (दि. ४) जुन्या ५ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले असल्याची ले ऑफ नोटीस बजावली. यामुळे बँकेतील सर्व कर्मचारी वर्ग आक्रमक झाले. मंगळवारी सकाळी १० वाजता सर्व कर्मचारी जेम्स स्टोन येथील मुख्य कार्यालय येथे जमा होऊन येथील कार्यालय सुरू होऊ न देता कामकाज बंद पाडले. नोटीस मागे घेत नाही तोपर्यंत शाखा सुरू करू देणार नाही. तातडीने यासंदर्भात बेठक घ्या. कमी केल्यानंतर भरपाईबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. जास्त पगारवाल्यांना कमी न करता कमी पगार असणाऱ्यांना कमी केले जात असल्याचा आरोप केले. बँकेच्या विस्तारात जुने कर्मचारी राबले आहेत. बँकेच्या अखेरपर्यंत काम करणार असून सर्व ठेवीदारांचे पैसे दिल्याशिवाय बाहेर पडणार नाही, अशी भूमीका काही कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
बँकेची स्थिती
स्थापना : २००३
शाखा : १२
ठेवी : ७ कोटी ९४ लाख
कर्ज : ७ कोटी ३० लाख
केंद्राकडे गुंतवणूक : १६ कोटी
कर्मचारी : १२७
ठेवीदारांसह ग्राहक संख्या : सुमारे १० हजार
परवाना रद्द : २४ डिसेंबर २०२०
कार्यक्षेत्र : महाराष्ट्र, कर्नाटक
चौकट
ठेवीदार सुरक्षित, कर्मचारी धोक्यात
केंद्र सरकारकडे १६ कोटींच्या सुरक्षा ठेव आहेत. त्यामुळे सर्व ठेवीदारांच्या ठेवी मिळणार आहेत. मात्र, १२७ कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. कोरोनामध्ये त्यांना दुसरीकडे नोकरीही मिळणे कठीण आहे. त्याचा गांभीर्याने व्यवस्थापनाने विचार केला पाहिजे.
प्रतिक्रिया
गरजेसाठी बँकेत ठेव ठेवली जाते. परवाना रद्द झाला असला तरी ठेवीदारांना वेळेवर आणि व्याजासह पैसे मिळाले पाहिजे. सर्व शाखा सुरू ठेवाव्यात, तातडीने प्रशासन नेमवा. जुने कर्मचारी प्रामिणकपणे कम करत असून त्यांना काढू नये.
माणिकलाल विभूते, ग्राहक, शनिवार पेठ
फोटो : ०५०१२०२० कोल सुभद्रा बँक
ओळी : कोल्हापुरातील सुभद्रा लोकल एरिया बँकेच्या व्यवस्थापनाने जुन्या कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कमी केले. येथील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी एकत्र जमून जेम्स स्टोन येथील मुख्य कार्यालयाचे काम बंद पाडले.