विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणार : कामत
By Admin | Updated: July 9, 2015 00:27 IST2015-07-09T00:27:00+5:302015-07-09T00:27:00+5:30
डिजिटल कौशल्य वाढविणार

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणार : कामत
माहिती-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आपल्या देशाचा २१व्या शतकावर वरचष्मा होऊ लागला आहे. त्याला बळकटी देण्यासह डिजिटल क्रांती सर्वव्यापी बनविण्यासाठी केंद्र सरकारने ‘डिजिटल इंडिया’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा शिवाजी विद्यापीठ आपल्या विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि समाज या घटकांसाठी कसा उपयोग करून घेणार, याबाबत विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे (आयक्यूएसी) नूतन संचालक व संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. के. कामत यांच्याशी साधलेला हा थेट संवाद
प्रश्न : ‘डिजिटल इंडिया’ संकल्पना काय आहे?
उत्तर : आपल्या देशाच्या ज्ञानवर्र्धित भविष्याची तयारी करणे ही ‘डिजिटल इंडिया’ची संकल्पना आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाकडून ती राबविण्यात येत आहे. यात डिजिटल साधनसामग्रीचा नागरिकांसाठी होणारा उपयोग, शासन व त्याच्या योजना या डिजिटल माध्यमातून नागरिक केंद्रित करणे, तसेच नागरिकांना डिजिटल स्वायत्तता देणे यांचा समावेश आहे. या अंतर्गत डिजिटल लॉकर, ई-कोर्ट, ई-पोलीस, ई-जेल, आदी योजना डिजिटल इंडियाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.
प्रश्न : डिजिटल लॉकरचा नागरिकांना कसा उपयोग होणार आहे?
उत्तर : डिजिटल इंडिया संकल्पनेतील डिजिटल लॉकरचा उपक्रम नागरिकांना उपयुक्त ठरणारा आहे. यात आपली महत्त्वाची कागदपत्रे ही डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी आॅनलाईन जागा उपलब्ध होणार आहे. एकदा संबंधित कागदपत्रे स्कॅन करून आपल्या डिजिटल लॉकरमध्ये ठेवल्यास ती कधीही आॅनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध होऊ शकतात. ही संकल्पना केंद्र सरकारने विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे.
प्रश्न : शिवाजी विद्यापीठाचा या उपक्रमात कसा सहभाग राहणार?
उत्तर : विद्यापीठाने समाजोपयोगी उपक्रमांची बांधीलकी जोपासली असून ती यापुढे अधिक व्यापक केली जाईल. यात संगणकशास्त्र विभागाने डिजिटल इंडिया उपक्रमाचा विद्यापीठाच्या प्रत्येक घटकासाठी अधिक सक्षमपणे उपयोग करून घेण्याचे ठरविले आहे. यातील पहिले पाऊल म्हणून प्रत्येक नागरिकाला उपयुक्त ठरणारे डिजिटल लॉकर उघडण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी आमच्या विभागात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. विद्यापीठातील सर्व कर्मचारी आणि कोल्हापूरकरांना विनामूल्य सेवा पुरविण्यात येणार आहे. महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची डिजिटल लॉकर उघडण्यात येतील. त्या दृष्टीने महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. विद्यापीठाची अंतर्गत गुणवत्ता वाढविण्यासह सातत्याने माहितीच्या माध्यमातून अद्ययावत होण्यासाठी ‘डिजिटल आयक्यूएसी’चा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिक्षकांना अध्यापनाचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी ई-क्लासचा विस्तार केला जाईल.
प्रश्न : विद्यार्थ्यांसाठी काय केले जाणार?
उत्तर : विद्यापीठाच्या कार्यप्रणालीचा केंद्रबिंदू असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी रोजगाराभिमुख आणि कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचा अजेंडा आखला आहे. अनेक विद्यार्थी पदवी, पदव्युतर शिक्षण घेतात; मात्र, त्यांना डिजिटल कौशल्य अवगत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ज्ञान असूनदेखील ते मागे राहतात. त्यामुळे डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना डिजिटल-साक्षर केले जाईल. त्यांच्यातील कौशल्ये विकसित केली जातील. त्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे घेण्यात येतील. त्यांच्यातील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देऊन ती विकसित करण्याची विद्यापीठाची भूमिका राहणार आहे.
प्रश्न : रोजगार निर्मितीच्या दृष्टीने काय करण्यात येईल?
उत्तर : सध्या व्हॉट्स अॅप, हाईक, टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडियाचा सर्रास संवाद साधण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींकडून वापर केला जातो. डिजिटल इंडिया उपक्रमात सोशल मीडियाला महत्त्व आहे. इंटरनेट सुविधेच्या माध्यमातून नागरिकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देणे. विविध योजना आॅनलाईन व मोबाईल केंद्रित करण्यासह नागरिकांना डिजिटल स्वायत्तता देण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या क्षेत्रात रोजगार निर्मितीचे प्रमाण वाढणार आहे. यात विविध स्वरूपांतील ई-प्रणाली, सॉफ्टवेअर, अॅप्स विकसित करण्याच्या क्षेत्रात रोजगार संधी वाढणार आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांमधील कौशल्ये विकसित केली जातील, त्यांना तसे प्रशिक्षण देऊन तयार केले जाईल.
- संतोष मिठारी