'नीट' परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही गर्दी; कोल्हापूर जिल्ह्यात ७ हजार १८२ विद्यार्थी

By संदीप आडनाईक | Published: May 6, 2024 12:26 AM2024-05-06T00:26:01+5:302024-05-06T00:26:25+5:30

जिल्ह्यातील १३ केंद्रांवर कडक नियमावली

Students and parents crowd for 'NEET' exam; 7 thousand 182 students in Kolhapur district | 'नीट' परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही गर्दी; कोल्हापूर जिल्ह्यात ७ हजार १८२ विद्यार्थी

'नीट' परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही गर्दी; कोल्हापूर जिल्ह्यात ७ हजार १८२ विद्यार्थी

संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: नॅशनल टेस्टींग एजन्सीच्यावतीने (एनटीए) अत्यंत महत्त्वाची असलेली वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी 'नीट' यूजी ही सामायिक प्रवेश परीक्षा रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील १३ केंद्रांवर सुरळीतपणे पार पडली. जिल्ह्यातील ७ हजार १८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

'नीट' परीक्षेसाठी कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती. उन्हामुळे विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहण्याला प्राधान्य दिले. सूचनेनुसार अनेक विद्यार्थी परीक्षेला येताना साधा पेहराव घालून आले होते. प्रत्येक केंद्रावर व्हिडिओ शूटिंग करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात आली. परीक्षार्थींनी मेटल डिटेक्टरमधून तपासणी करुनच परीक्षा केंद्रात प्रवेश केला.

जिल्ह्यातील डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी, विवेकानंद कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, न्यू पॉलिटेक्निक, कमला कॉलेज, संजय घोडावत इन्स्टियूट, केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, अशोकराव माने ग्रुप इन्स्टियूशन, पोदार इंटरनॅशनल स्कूल या परीक्षा केंद्रांवरील परीक्षा सुरळीत पार पडली. दुपारी परीक्षा असल्याने सकाळपासून अनेक विदयार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर येणे पसंत केले होते. अनेकांसोबत त्यांचे पालकही आल्यामुळे या परीक्षा केंद्रांवर गर्दी झाली होती.

रविवारी दुपारी २ ते ५ यावेळेत ही 'नीट'ची परीक्षा झाली. ७२० गुणांची परीक्षेसाठी २०० प्रश्न विचारले, त्यापैकी १८० प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवावे लागले. निगेटिव्ह मार्किंग असल्याने प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी गुण वजा केले जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक प्रश्न सोडवले. 

कोल्हापूर केंद्रावर सुमारे ७ हजार ३३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ७१८२ विद्यार्थी परीक्षेला बसले. यात २५ दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश होता.
-शिल्पा कपूर, समन्वयक,'नीट' परीक्षा, कोल्हापूर.

Web Title: Students and parents crowd for 'NEET' exam; 7 thousand 182 students in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.