जुळून आल्या रेशीमगाठी...!
By Admin | Updated: September 7, 2014 23:18 IST2014-09-07T23:03:31+5:302014-09-07T23:18:46+5:30
कोल्हापूरचा निखिल अन् पोलंडची कॅट्राझेना यांचा विवाह संपन्न

जुळून आल्या रेशीमगाठी...!
कोल्हापूर : फुलांच्या पायघड्या... सनईचे सूर, मंगलाष्टकांचा स्वर, आप्तेष्टांचे आशीर्वाद... हिंदू संस्कृतीशी नाळ जोडत पोलंडवासीयांनी केलेला भारतीय पारंपरिक पद्धतीचा पेहराव... अशा सुरेख वातावरणात कोल्हापूरचा निखिल आणि पोलंडची कॅट्राझेना यांचा विवाह आज, शनिवारी पार पडला.
कोल्हापुरातील धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉलमध्ये मूळचे कोल्हापूरचे आणि आता सिंगापूरमध्ये स्थायिक झालेले निखिल मेत्राणी व पोलंडची कॅट्राझेना टेलेस्की यांचा शुभविवाह भारतीय संस्कृतीतील वैदिक पद्धतीने झाला. यावेळी निखिलची आई कांचन, वडील दिलीप मेत्राणी, कॅट्राझेनाची आई जॉना आणि वडील मॅरेक टेलेस्की यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते. या विवाहासाठी कॅट्राझेनाची मावशी, काका-काकू, आत्या असे जवळपास सोळा नातेवाईक आले होते.
महिलांनी डिझायनर साडी, घागरा अशी वेशभूषा केली होती; तर पुरुषांनी सलवार-कमीज परिधान केले होते. या विवाह सोहळ्याला नातेवाईक व आप्तेष्ट मोठ्या संख्येने आले होते. वधू-वरांचे नातेवाईक एकमेकाला आपापल्या संस्कृतीची माहिती व नातेवाइकांची ओळख करून देत होते. या निमित्ताने कोल्हापूर व पोलंडवासीयांचे ऋणानुबंध अधिक दृढ झाले आणि दोन भिन्न देश व संस्कृतींचा सुरेख मिलाफ अनुभवायला मिळाला. (प्रतिनिधी)