‘गडहिंग्लज’च्या सेवानिवृत्त कामगारांचा लढा तीव्र करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:59 IST2021-01-13T04:59:41+5:302021-01-13T04:59:41+5:30
गडहिंग्लज : थकीत फायनल पेमेंट व ग्रॅच्युइटी रकमेच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेली लढाई आणखी तीव्र करण्याचा निर्धार आप्पासाहेब ...

‘गडहिंग्लज’च्या सेवानिवृत्त कामगारांचा लढा तीव्र करणार
गडहिंग्लज : थकीत फायनल पेमेंट व ग्रॅच्युइटी रकमेच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेली लढाई आणखी तीव्र करण्याचा निर्धार आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांनी आज मेळाव्यात केला. येथील लक्ष्मी मंदिरात हा मेळावा झाला.
सेवानिवृत्त कामगारांच्या प्रश्नासंदर्भात कारखाना आणि कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करणे व निर्णय घेण्याचे अधिकार चंद्रकांत बंदी, सुभाष पाटील, बाळासाहेब मोहिते, रणजित देसाई, लक्ष्मण देवार्डे, महादेव मांगले, हणमंत चौगुले व बाबूराव पाटील यांना देण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला.
सेवानिवृत्त कामगारांची थकीत रक्कम कायदेशीर मार्गाने व जनआंदोलनाद्वारे वसूल करणे, सेवानिवृत्तीनंतर फायनल पेमेंट व ग्रॅच्युइटी रक्कम ३० दिवसात देण्यास व्यवस्थापनाला भाग पाडणे, हंगामी कामगारांना सेवेत कायम न केल्याबद्दल जाब विचारणे, थकीत ऊस बिल वसूल करणे, कारखाना इमारत व कामगार वसाहतीच्या दुरवस्थेबद्दल जाब विचारण्याचा निर्णय ठरावाद्वारे घेण्यात आला. मेळाव्यास आनंदराव नलवडे, बाळासाहेब लोंढे, सुरेश पाटील, बबन पाटील आदींसह कामगार उपस्थित होते. चंद्रकांत बंदी यांनी प्रास्ताविक केले. आप्पासाहेब कांबळे यांनी आभार मानले.
----------------------------------
* बुधवारी संयुक्त बैठक
सेवानिवृत्त कामगारांच्या मागण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी कारखाना आणि ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीच्या अधिका-यांची संयुक्त बैठक बुधवार (१३) रोजी दुपारी ३.३० वाजता कोल्हापूर येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात बोलावण्यात आली आहे, अशी माहिती बंदी यांनी दिली.
----------------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांचा मेळावा श्री लक्ष्मी मंदिरात झाला. यावेळी मेळाव्यास उपस्थित तालुक्यातील कामगार उपस्थित होते.
क्रमांक : ११०१२०२१-गड-०४