कोल्हापुरात कडकडीत बंद, महापालिका, पोलीस प्रशासनाची आक्रमक भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 19:19 IST2021-05-06T19:17:50+5:302021-05-06T19:19:07+5:30
CoronaVirus Kolhapur : जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यापासून सकाळपासून दुपारपर्यंत असणारी गर्दी गुरुवारी महापालिका कर्मचारी, अधिकारी तसेच पोलिसांनी रोखली. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोल्हापूर कडकडीत बंद झाले. भाजी मंडई, शहरातील दुकाने, सर्व रस्ते ओस पडले. वारंवार सांगून, सूचना देऊनही नागरिक ऐकत नाहीत म्हटल्यावर महापालिका व पोलिसांना आक्रमक भूमिका घ्यावी लागली.

कोल्हापुरात कडकडीत बंद, महापालिका, पोलीस प्रशासनाची आक्रमक भूमिका
कोल्हापूर : जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यापासून सकाळपासून दुपारपर्यंत असणारी गर्दी गुरुवारी महापालिका कर्मचारी, अधिकारी तसेच पोलिसांनी रोखली. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोल्हापूर कडकडीत बंद झाले. भाजी मंडई, शहरातील दुकाने, सर्व रस्ते ओस पडले. वारंवार सांगून, सूचना देऊनही नागरिक ऐकत नाहीत म्हटल्यावर महापालिका व पोलिसांना आक्रमक भूमिका घ्यावी लागली.
कोल्हापूर जिल्ह्यात दि. १४ एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू केली आहे. सकाळी सात ते अकरा यावेळेत केवळ अत्यावश्यक सेवा, औषध दुकाने, पेट्रोल पंप सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. ३० एप्रिलपासून दि. १३ मे पर्यंत संचारबंदी पुन्हा वाढविण्यात आली. परंतु, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली शहरात दुपारपर्यंत सर्वच रस्ते नागरिकांच्या गर्दीने तसेच वाहनांनी भरलेले असायचे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार सूचना दिल्या, परंतु नागरिक काही केल्या ऐकत नव्हते.
महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात आढावा घेतला आणि गुरुवारपासून शहरातील सर्वच भाजी मंडई बंद करण्याचा तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकानांना घरपोहोच सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यापासून सर्व वरिष्ठ अधिकारी सकाळी सात वाजताच शहराच्या विविध भागात रस्त्यावर उतरले.
अधिकाऱ्यांनी मज्जाव केल्यामुळे कोणाही भाजी विक्रेत्यांना आपला व्यवसाय सुरू करता आला नाही. फेरीवालेसुद्धा गायब झाले. शाहुपूरी पाच बंगला येथील भाजी मंडई तर बॅरिकेड लावून बंद केली होती. कपिलतीर्थ, राजारामपुरी, गंगावेश, पंचगंगा घाट येथील भाजी मंडईतही मनपाचे कर्मचारी, पोलीस थांबून होते.
पालिका, पोलीस यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शहरातील कोणतीही दुकाने गुरुवारी उघडली नाहीत. फक्त औषधांची दुकाने, पेट्रोल पंप सुरू होते. तुरळक सुरू असणारी रिक्षा वाहतूकही बंद झाली. शहराच्या अनेक चौकांत त्या त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तसेच शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी नाकाबंदी केली होती. प्रत्येक नागरिकाला दुचाकीवरून जाताना अडविले जात होते. योग्य कारणाशिवाय फिरणाऱ्यांवर गाड्या जप्तीची कारवाई केली जात होती. त्यामुळे सकाळी अकरा वाजताच शहरात कडकडीत बंद सुरू झाला.