टेस्टिंगबाबत कडक धोरण राबविले म्हणूनच संसर्गाला आळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:17 IST2021-07-19T04:17:05+5:302021-07-19T04:17:05+5:30
कोल्हापूर : शहरात केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्या राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे केल्या जात असून चाचण्यांच्या बाबतीत कडक धोरण राबविल्यामुळेच ...

टेस्टिंगबाबत कडक धोरण राबविले म्हणूनच संसर्गाला आळा
कोल्हापूर : शहरात केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्या राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे केल्या जात असून चाचण्यांच्या बाबतीत कडक धोरण राबविल्यामुळेच शहरातील कोरोनाबाधित रुग्णांपर्यंत जलद गतीने पोहचणे, त्यांचे अलगीकरण तसेच उपचार करणे शक्य झाले असल्याचा दावा महानगरपालिका आरोग्य विभागाने रविवारी केला.
कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून महानगरपालिकेच्या ११ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांत तसेच आयसोलेशन, सावित्रीबाई फुले, पंचगंगा हॉस्पिटल येथे कोविड टेस्टिंगसाठी स्वॅब घेण्याची मोफत सुविधा महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली आहे. तसेच विविध प्रतिबंधात्मक क्षेत्रात व हॉटस्पॉट भागात स्वॅब घेण्यासाठी विविध पथके तयार करून भागात टेस्टिंग करण्याची सुविधा निर्माण केलेली आहे.
एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास तो परिसर औषध फवारणी करून निर्जंतुक केला जातो. परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित केला जातो. पेशंटच्या प्रथम संपर्क तसेच द्वितीय संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची आरोग्य विभाग व प्रभाग सचिव यांच्यामार्फत यादी बनवून लक्षणांनुसार त्यांचे स्वॅब घेऊन लॅबला पाठवले जातात. पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाते व त्यांच्या कोविड टेस्ट केल्या जातात, याचे प्रमाण एका पेशंटमागे २० ते २५ पेशंट इतके असते.
प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्व्हे केला जातो. व्याधीग्रस्त नागरिक, लक्षणे असणाऱ्या नागरिकांच्या कोविड टेस्ट केल्या जातात, व्याधीग्रस्त नागरिकांचे लवकर निदान होऊन लवकर उपचार सुरू झाल्यामुळे मृत्यूदर कमी करण्यास मदत होणार आहे. प्रत्येक पॉझिटिव्ह आलेल्या पेशंटच्या मागे किमान १० हाय रिस्क कॉन्टॅक्ट शोधून त्यांचे स्वॅब घेण्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.
- ७० टक्के रुग्ण लक्षणे नसलेले-
महापालिकेच्या पाहणीत आढळून आले आहे की, पॉझिटिव्ह आलेल्या पेशंटपैकी ७० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त पेशंट कोणतीही लक्षणे नसलेले आहेत आणि ‘सायलेंट कॅरियर’ म्हणून कोविड विषाणूचा प्रसार करू शकतात. म्हणून अशा व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण करता यावे यासाठी प्रतिबंधात्मक क्षेत्रात
टेस्टिंगचे प्रमाण वाढवून जास्तीत जास्त टेस्ट आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.