बाबासो हळिज्वाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोगनोळी : बेळगाव महापालिकेसमोर उभारलेला ध्वज काढण्यासाठी मोर्चाचे आयोजन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या समर्थनार्थ निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी टोल नाका येथे अडवले. तेथूनच शिवसैनिकांना माघारी पाठविले. सकाळपासूनच कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी जवळील दूधगंगा नदीवर चोख बंदोबस्त ठेवला होता.
बेळगाव महापालिकेसमोर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी लाल-पिवळा ध्वज उभा केला होता. हा ध्वज हटवावा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी केली होती. ध्वज न हटवल्यास मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीने दिला होता. बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा स्थगित करण्यात आला. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक बेळगावच्या दिशेने येणार असल्याचे कळताच कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी जवळील दूधगंगा नदीपासून ते टोल नाक्यापर्यंत कडक बंदोबस्त ठेवला होता.
दुपारी एकच्या सुमारास शिवसेना जिल्हा उपप्रमुख संभाजी भोकरे, धर्माजी सायनेकर, विभागप्रमुख वैभव आडके, राजेंद्र साळोखे, उत्तम पाटील, किरण दळवी, धनाजी नागराळे, किरण कुलकर्णी आदी कार्यकर्ते बेळगावच्या दिशेने जात असता कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक पोलिसांनी अडवून त्यांना परत पाठवले. गाडीतून उतरलेल्या कार्यकर्त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून गाडी महाराष्ट्राच्या दिशेने मार्गस्थ करण्यास सांगितले.
चौकट
महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेला मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर स्थगित केला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा व्यक्तींना कर्नाटकात जाण्यापासून रोखले जात आहे.
- मनोज कुमार नायक, पोलीस उपाधीक्षक चिकोडी
चौकट
कर्नाटक पोलिसांनी राज्याच्या सीमेवरती अडवून परत आम्हांला महाराष्ट्रात पाठवून दिले, ही दडपशाही निंदनीय आहे. भविष्यात यापुढेही या दडपशाहीला झुगारून आम्ही शिवसैनिक सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.
- संभाजी भोकरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख
२१ कोगनोळी शिवसैनिक
कोल्हापूर
फोटो ओळ : बेळगावच्या दिशेने निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरती अडवून परत महाराष्ट्रात पाठवून दिले.
छाया : बाबासो हळिज्वाळे