सहकारमंत्र्यांच्या दारात गुरुवारपासून ठिय्या
By Admin | Updated: February 7, 2015 00:23 IST2015-02-07T00:21:59+5:302015-02-07T00:23:45+5:30
प्रभाकर देशमुख : ऊस दरासाठी जनहित शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन

सहकारमंत्र्यांच्या दारात गुरुवारपासून ठिय्या
कोल्हापूर : उसाचा गळीत हंगाम संपत आला तरी अजून शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळालेले नाहीत, साखर कारखानदारांबरोबरच सरकारचीही संवेदना गेली असून, त्यांना जाग आणण्यासाठी गुरुवार (दि. १२) पासून दोन दिवस सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती राज्य जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिली. त्यांनी ऐकले नाहीतर कारखानदारांबरोबर राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देण्यासाठी १४ फेबु्रवारीला सहकारमंत्र्यांच्या दारातून अंबाबाईला लोटांगण घालत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंधरा वर्षे दोन्ही काँग्रेसच्या जुलूमशाहीला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने युतीला सत्तेवर बसवले पण त्यांनीही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केले. गळीत हंगाम सुरू होऊन तीन महिने उलटले तरी एफ.आर.पी.प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाहीत. याबाबत दोनवेळा मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांना भेटलो, पण आश्वासनापलीकडे काहीच हातात पडले नाही. गेले महिनाभर सोलापूर जिल्ह्यात विविध आंदोलने सुरू आहेत. साखर आयुक्त कार्यालयात धरणे आंदोलन, मोर्चे, पालकमंत्र्यांच्या घरासमोर बोंबा-बोंब आंदोलन, हुतात्मा पुतळ्यांसमोर उघडे आंदोलन, भीक मांगो आंदोलनासह ‘हलगी नाद’ आंदोलन करून या सरकारचे कान उघडण्याचा प्रयत्न केला, पण झोपेचे सोंग घेतलेल्या कारखानदार व सरकारला शेतकऱ्यांचा आवाज ऐकू जात नाही.
या सरकारला जाग आणण्यासाठी सहकारमंत्र्यांच्या दारातच ठिय्या मारण्याचा निर्णय घेतला. दखल घेतली नाही तर तेथूनच लोटांगण घालत अंबाबाई मंदिराकडे येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आधी दर जाहीर मगच कोयता
या हंगामात सरकारने शेतकऱ्यांना फसविले आहे. आता आम्ही शहाणे झाले असून, पुढील हंगामात आधी दर जाहीर करा मगच उसाला कोयता लावण्यास परवानगी देऊ, असा इशारा देशमुख यांनी दिला.
दुकानात पुडी बांधायच्या आधी पैसे
किराणा मालाच्या दुकानात मालाची पुडी बांधायच्या आधी दुकानदार पैसे घेतो. मग उसाबाबतच असे का होते, ऊस तुटल्यानंतर पंधरा दिवसांनी आम्ही पैसे मागतो तरीही देत नाही, हा कसला न्याय म्हणायचा, असा सवाल देशमुख यांनी केला.
कारखानदारांविरोधात शड्डू ठोकणारा संचालक
प्रभाकर देशमुख हे मोहोळ पंचायत समितीचे सदस्य व भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. एका कारखान्याचे संचालक असताना शेतकऱ्यांसाठी कारखानदारांविरुद्ध शड्डू ठोकणारे ते एकमेव संचालक असतील.