तणाव, धक्कातंत्र अन् उत्कंठा शिगेला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 01:00 IST2018-12-10T01:00:20+5:302018-12-10T01:00:25+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आज, सोमवारी होणाऱ्या महापौर निवडणुकीबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. या निवडणुकीत धक्कातंत्राचा, फोडाफोडीच्या राजकारणाचा, ...

तणाव, धक्कातंत्र अन् उत्कंठा शिगेला !
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आज, सोमवारी होणाऱ्या महापौर निवडणुकीबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. या निवडणुकीत धक्कातंत्राचा, फोडाफोडीच्या राजकारणाचा, एकमेकांना आव्हान देण्याच्या प्रयत्नांचा तसेच आर्थिक घडामोडींचा काही परिणाम होणार आहे का याची प्रतीक्षा प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत पाहावी लागणार आहे.
भाजपकडून नगरसेवकांची पदे रद्द करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच सभागृहाबाहेर हसन मुश्रीफ विरुद्ध चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला. मुश्रीफ-पाटील यांच्यात अनेक वेळा असे शाब्दिक हल्ले झाले. मात्र, महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाच तर जबाबदार धरावे, असा एकमेकांनी प्रशासनास आवाहन केले आहे.
महाबळेश्वरात झाला निर्णय
शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, नगरसेवक नियाज खान, राहुल चव्हाण, प्रतिज्ञा निल्ले शनिवारी महाबळेश्वरमध्ये मुक्कामास होते. नगरसेवक अभिजित चव्हाण रविवारी त्यांना जाऊन मिळाले. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी या सर्वांची बैठक घेऊन पाठिंबा की तटस्थ राहायचे यावर चर्चा केली. आमदार क्षीरसागर हे भाजपला पाठिंबा द्यायचा नाही यावर अखेरपर्यंत ठाम होते. भाजपने कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे खच्चीकरण कशाप्रकारे केले याचा पाढाच क्षीरसागर यांनी वाचला. चर्चेअंती भाजपला पाठिंबा द्यायचा नाही यावर एकमत झाले.
जर तटस्थ राहायचे असेल तर निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यायलाच नको, आपण सभागृहात जाऊ नये असे अरुण दुधवडकर यांनी सुचविले; पण क्षीरसागर यांनी आपल्या नगरसेवकांनी सभागृहात जावे, पण तेथे जाऊन तटस्थ असल्याचे दाखवून द्यावे, असे सुचविले नंतर त्यावरदेखील एकमत झाले. त्यामुळे शिवसेनेचे चार नगरसेवक सभागृहात जाणार आहेत. शिवसेनेच्या चार नगरसेवकांच्या पाठिंब्यासाठी माजी नगरसेवक आदिल फरास व नगरसेवक संजय मोहिते गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यासोबत होते.
अर्थकारणाचं गणित आज उलघडणार
या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण सुरू होताच काठावर असलेल्या दोन्ही आघाड्यांतील नगरसेवकांचे भाव चांगलेच वधारले होेते. २५ लाखांपासून ते ६० लाखांपर्यंत हे भाव चढले होते; पण शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपली भूमिका दीर्घकाळ गुलदस्त्यात ठेवल्याने आर्थिक घडामोडी थांबविण्यात आल्या होत्या. संख्याबळाचे गणित जमत नसेल तर कोणाबरोबर व्यवहार करायचे हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे प्राथमिक बोलण्या करून ठेवण्यात आल्या होत्या; पण प्रत्यक्ष व्यवहार झाले की नाही, नगरसेवक फुटणार की नाहीत या प्रश्नाचे उत्तर आज, सोमवारी सभागृहात मिळणार आहे.
महापालिका, पोलीस प्रशासन सज्ज
महापौर - उपमहापौर निवडणुकीच्या निमित्ताने महापालिका तसेच पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक काळात महापालिका कर्मचारी, नगरसेवक, पत्रकार यांनाच फक्त ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जाणार आहे. महापालिका मुख्य कार्यालयात, तसेच चौकात अन्य कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच कार्यालयासमोरील रस्ताही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी दुपारी चार वाजता अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, उपअधीक्षक सूरज गुरव, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक वसंत बाबर, महापालिका उपायुक्त मंगेश शिंदे, नगरसचिव दिवाकर कारंडे, विजय वणकुद्रे, आदींनी बंदोबस्त व निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने पाहणी केली. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, याची पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे.
महापालिकेला पोलिसांचे कडे
चुरशीने होणाºया कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदांची निवडणूक आज, सोमवारी होत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या पार्श्वभूमीवर महापालिकेला सकाळी सातपासून सशस्त्र पोलिसांचे कडे राहणार आहे. बंदोबस्ताच्या सूचना रविवारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर सर्वांना देण्यात आल्या. निवडणूक वातावरण तणावसदृश असल्याने पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. महापालिका परिसरात असणाºया प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हालचालींवर साध्या वेश्यातील पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. काही पोलीस स्वत: व्हिडिओ कॅमेरे घेऊन असणार आहेत. निवडणुकीसाठी पोलीस सज्ज असलेची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.
असा असेल पोलीस बंदोबस्त : अप्पर पोलीस अधीक्षक : १, पोलीस उपअधीक्षक : २, पोलीस निरीक्षक : ५, पोलीस उपनिरीक्षक : १७, पोलीस कर्मचारी : १५०, दंगल नियंत्रण पथके २ (६०), जलद कृती दल पथके २ (३०)
महापौर निवड मदतीसाठी खासदारांना विचारणा
महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक अपात्रतेमुळे गोंधळ निर्माण झाला आहे, अशा परिस्थितीत ताराराणी आघाडीच्या माध्यमातून खासदार धनंजय महाडिक यांनी मदत करून राष्टÑवादीचा महापौर करण्यास मदत करावी, याबाबत पक्षाच्यावतीने त्यांना विचारणा केली, पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती राष्टÑवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपने कितीही आकडतांडव केले तरी राष्टÑवादी काँग्रेसचा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी, सध्या काँग्रेस आघाडीचे सहा नगरसेवक अपात्र होत असल्याने महापौर निवडीत राष्टÑवादीसमोर अडचण निर्माण झाली आहे. अशा अडचणीच्या वेळी खासदार धनंजय महाडिक यांनी मदत केली तर पक्षांतर्गत त्यांच्याविषयी असेलली नाराजी कमी होण्यास मदत झाली असती, अशी विचारणा पत्रकारांनी पोवार यांना केली. यावर, याबाबत पक्षाच्यावतीने सांगण्यात आले, पण ताराराणी आघाडीची सूत्रे आपल्याकडे नाहीत, असे ते म्हटल्याचे आर. के. पोवार यांनी सांगितले. अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांच्या अपात्रतेबाबत कायदेशीर सल्ला घेऊन उच्च न्यायालयात जाणार आहोत.
शिवसेनेच्या घडामोडी पाचगणीतून
शिवसेनेचे चार नगरसेवक आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत पाचगणी येथे ‘मातोश्री’ बंगल्यावर आहेत, तेथूनच या घडामोडी सुरू होत्या. त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला आहे; पण तरीही या नगरसेवकांनी सभागृहात उपस्थित राहावे, असा आग्रह आ. क्षीरसागर यांचा आहे; पण तटस्थच राहायचे तर सभागृहात अनुपस्थित राहावे, असा आग्रह जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी धरला आहे. त्याबाबत रात्री उशिरापर्यंत निर्णय झालेला नव्हता.
काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी : या आघाडीचे सर्व सदस्य पहाटे आंबा येथून कोल्हापूरकडे रवाना होत ‘अजिंक्यतारा’ कार्यालयात येतील. त्यानंतर तेथून सव्वादहा वाजण्याच्या सुमारास आराम गाडीतून महापालिकेत येतील. यावेळी दोन्हीही आघाडीचे नेते उमेदवारांसह उपस्थित राहणार आहेत.
भाजप-ताराराणी आघाडी : या आघाडीचे
सर्व सदस्य रविवारी रात्री उशिरा मार्केट यार्ड येथील एका हॉटेलवर आले. आज, सोमवारी तेथून निघून थेट महापालिकेत सकाळी १० वाजता ते पोहोचणार आहेत.
शिवसेनेच्या भूमिकेमुळे
‘राष्टÑवादी’चे नेते तणावमुक्त
गेल्या तीन दिवसांपासून आमची भूमिका अद्याप ठरलेली नाही, ‘मातोश्री’वरून निरोप आल्यावर ती स्पष्ट केली जाईल, असे सांगणाºया शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी रविवारी सायंकाळी महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली. शिवसेनेच्या निर्णयाअभावी गेले तीन दिवस भाजपसह राष्टÑवादीचे नेतेही तणावात होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते. भाजपच्या उमेदवारास पाठिंबा द्यावा याकरिता त्यांनी जंगजंग प्रयत्न केले. त्यामुळे राष्टÑवादीचे नेतेही काळजीत होते; परंतु रविवारी सायंकाळी भूमिका स्पष्ट केल्यानंतर काँग्रेस व राष्टÑवादीत उत्साह निर्माण झाला. कारण शिवसेनेने तटस्थ राहणे हेसुद्धा कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या फायद्याचे ठरणार आहे.
अपात्रतेची उत्कंठा
काँग्रेस-राष्टÑवादीचे पाच आणि भाजपचे एक नगरसेवक जातपडताळणी दाखल्याबाबत अपात्र ठरण्याची शक्यता आहे; पण त्याबाबत आज निर्णय लागण्याची शक्यता असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखविले होते; त्यामुळे या सहा नगरसेवकांवर टांगती तलवार आहे. त्यांच्याबाबत काय निर्णय होईल? याबाबत महापालिका वर्तुळात उत्कंठा लागून राहिली आहे.