दिव्यांग शिवाजीच्या पायांना पुन्हा हिमतीचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST2021-05-07T04:25:22+5:302021-05-07T04:25:22+5:30
कोल्हापूर : विक्रमनगरातील शिवाजी राजाराम अंकुशे यांचे एका अपघातात दोन्ही पाय गमवले गेले. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडता येईना. ...

दिव्यांग शिवाजीच्या पायांना पुन्हा हिमतीचे बळ
कोल्हापूर : विक्रमनगरातील शिवाजी राजाराम अंकुशे यांचे एका अपघातात दोन्ही पाय गमवले गेले. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडता येईना. त्यात कोरोना महामारीमुळे संसाराची घडी बिघडली. याची माहिती मिळताच जयेश ओसवाल व त्यांच्या कुटुंबीयांनी मोहनलाल रायचंदजी ओसवाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी त्यांना तीनचाकी सायकल भेट दिली.
शिवाजी हे पत्नीसह विक्रमनगरात राहतात. तांब्याच्या अंगठ्या व रिंगा विकून आपल्या संसाराचा गाडा चालवितात. एके दिवशी झालेल्या एका अपघातात त्यांचे दोन्ही पाय शस्त्रक्रिया करून काढावे लागले. त्यातून त्यांना कायमचे अपंगत्व आले. अचानक आलेल्या अपंगत्वामुळे व त्यात कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाल्याने त्यांना व पत्नीला कुटुंबाचा गाडा चालविणे अवघड झाले. याची माहिती जयेश ओसवाल यांना मिळाली. त्यांनी शिवाजी यांना पुन्हा आपल्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनविण्याच्या हेतूने ओसवाल परिवारातर्फे मोहनलाल ओसवाल यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी तीनचाकी सायकल व मास्क दिले. मास्क विकून पुन्हा ते आपल्या स्वबळावर उभे राहतील, अशी तरतूद ओसवाल यांनी करून दिली. यावेळी गीता हसूरकर, राहुल राजशेखर, उत्तम फराकटे, रवींद्र मुतगी, सुनीलसिंह चव्हाण, शैलेश ओसवाल, वैभव ओसवाल, जियांश संघवी, शशिकांत कुलकर्णी, आदी उपस्थित होते.
फोटो : ०६०५२०२१-कोल-सायकल वितरण
ओळी : जयेश ओसवाल यांनी कुटुंबीयांतर्फे गुरुवारी अपघातात अपंगत्व आलेल्या शिवाजी अंकुशे यांना तीनचाकी सायकल प्रदान केली. यावेळी गीता हसूरकर, राहुल राजशेखर, आदी मान्यवर उपस्थित होते.