रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी थांबवा

By Admin | Updated: February 7, 2015 00:23 IST2015-02-07T00:20:58+5:302015-02-07T00:23:51+5:30

पी. शिवशंकर : ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याची सूचना; सुमारे तीन तास केली पाहणी

Stop the wastewater mixing in the morning | रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी थांबवा

रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी थांबवा

कोल्हापूर : कोल्हापूर शहराचे वैभव असलेला ऐतिहासिक रंकाळा पूर्व वैभव प्राप्त करून देण्यासाठी तत्काळ ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करा. पडलेल्या भिंतींच्या दुरुस्तीसाठी पावले उचला. रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी शंभर टक्के थांबलेच पाहिजे, असे आदेश आज (शुक्रवार) महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले.तलावाची कोसळलेली भिंत, धुण्याची चावी परिसर, बगीचे, शेवाळलेले पाणी, परिसरातील रस्ता, निर्माल्य कुंड, आदी परिसरातील रंकाळ्याची पाहणी नूतन आयुक्तांनी केली. यावेळी पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड व महापालिकेचे सर्वच प्रमुख अधिकारी उपस्थित होते.पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रंकाळा तलावाचे दुर्दैव दिवसेंदिवस वाढतच आहे. आठ महिन्यांत रंकाळा तलावाच्या पश्चिमेकडील बाजूच्या तटबंदी तीन वेळा कोसळल्या याची पाहणी आयुक्तांनी केली. पाटबंधारे विभागाची मदत घेऊन दुरुस्तीचे काम सुरू करण्याच्या सूचना आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिल्या. दूषित पाण्याने रंकाळ्याच्या पाण्याचा रंगच बदललेला आहे. सहा कोटी रुपये खर्चूनही अध्याप सांडपाण्याचे दुखणे कायम असल्याने आयुक्तांनी आश्चर्य व्यक्त केले. रंकाळ्यात मिसळणारे शंभर टक्के सांडपाणी थांबले पाहिजे, नैसर्गिक पुनर्भरणासाठी आवश्यक उपाययोजना करा, असे अधिकाऱ्यांना बजावले. रंकाळा परिसरातील रस्ताही आयआरबी व महापालिका यांच्या वादात अडकून पडला आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी रंकाळ्याची पाहणी करून अधिकारी व प्रशासनास तत्काळ कामाला सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या. धुण्याच्या चाव्या व बगीचा, आदी परिसराची दररोज स्वच्छता झाली पाहिजे, याबाबत आरोग्य विभागाने विशेष काळजी घेण्याबाबत आयुक्त पी. शिवशंकर यांनी सुनावले.
यावेळी उपायुक्त विजय खोराटे, अश्विनी वाघमळे, आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता मनीष पवार, आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, आदींसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करा
रंकाळ्याप्रश्नी प्रशासनासह लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने शहरवासीयांतून संताप व्यक्त होत आहे. यापूर्वीही महापौर, पदाधिकारी व आयुक्तांनी अनेकवेळा रंकाळ्याची पाहणी केली आहे; मात्र प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ राहिली आहे. नूतन आयुक्तांनी आज तब्बल तीन तासांहून अधिक काळ रंकाळा परिसराची पाहणी करून तत्काळ काम सुरू करण्याचे दिलेले आदेश प्रत्यक्षात किती उतरतात, याचे उत्तर येत्या काही दिवसांतच मिळणार आहे.

Web Title: Stop the wastewater mixing in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.