ढवळून काढणारा प्रचारच नाही सीमाभागातील वातावरण : मोजक्या कार्यकर्त्यांसह पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:31 IST2018-05-08T00:31:00+5:302018-05-08T00:31:00+5:30
बेळगाव : हलगी, घुमक्याचा आवाज नाही, उमेदवार गल्लीत आले की फटाक्यांची माळ नाही, शेकडो कार्यकर्त्यांचा जथ्था बरोबर नाही, अशा वातावरणात महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकातील सीमाभागात

ढवळून काढणारा प्रचारच नाही सीमाभागातील वातावरण : मोजक्या कार्यकर्त्यांसह पदयात्रा
समीर देशपांडे ।
बेळगाव : हलगी, घुमक्याचा आवाज नाही, उमेदवार गल्लीत आले की फटाक्यांची माळ नाही, शेकडो कार्यकर्त्यांचा जथ्था बरोबर नाही, अशा वातावरणात महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकातील सीमाभागात विधानसभा निवडणुकीचे वातावरण दिसून येत आहे. कोल्हापूर आणि परिसरातील निवडणुकीच्या वातावरणापेक्षा तर हे वातावरण शांतच वाटते.
बेळगावपासून जवळच असलेल्या खानापुरात आम्ही गेलो तर बाजारात नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू होते. अरविंद पाटील आणि विलास बेळगावकर या उमेदवारांच्या कार्यालयात निवडक कार्यकर्ते बसून होते. उमेदवार ग्रामीण भागात प्रचाराला गेले होते. मधूनच दोन चार पक्षाचे झेंडे लावलेल्या गाड्या ये-जा करत होत्या. बेळगावमध्येही कुठेही फार मोठ्या पदयात्रा दिसून आल्या नाहीत. दिवसभर ऊन म्हणून संध्याकाळी वातावरण तापेल म्हटले तरी अगदी मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवार भेटी देत असल्याचे दिसून आले. कुठेही जंगी पदयात्रा काढण्यात आल्याचे चित्र दिसत नव्हते. हुक्केरीमध्ये मात्र रिक्षा आणि जीपमधून गाण्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू होता.
गाड्यांना झेंडे लावले होते आणि रेकॉर्ड केलेली आवाहनाची कन्नड गाणी येथे ऐकायला मिळाली. चिकोडीमध्येही यापेक्षा वेगळे वातावरण नव्हते. मात्र निपाणीत आल्यानंतर वातावरणात फरक पडला. या ठिकाणी काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. दुसरीकडे आमदार शशिकला जोल्ले यांनी चारचाकी गाडीला रथासारखा आकार दिला होता, ती गाडी दिसत होती. काका पाटील यांच्या प्रचारासाठी एक मराठी शाहीर पथकच कार्यरत असल्याचे येथे दिसून आले. सुशीलकुमार शिंदेंच्या प्रचारसभेसाठी आवाहन केले जात होते. निपाणीत आल्यानंतर निवडणुकीचा माहोल वाटत होता. शेवटच्या टप्प्यात वातावरणनिर्मिती आता शेवटच्या टप्प्यात जोरदार प्रचाराची आखणी उमेदवारांनी केल्याचे दिसून आले. आतापर्यंत छोटी छोटी गावे संपवून शेवटच्या टप्प्यात मोठ्या मोठ्या गावांमध्ये प्रचाराचा धुरळा उडेल, असे चित्र आहे.