हवाईदल एनसीसीसाठी राज्य शासनाची नकारघंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 13:13 IST2019-07-03T13:10:10+5:302019-07-03T13:13:07+5:30
कोल्हापूरला हवाई दल (एअर विंग) एनसीसी सुरू करण्यास डायरेक्टर जनरल, एनसीसी यांनी तत्त्वत: मंजुरी दिली असतानाही, महाराष्ट्र शासन त्याला मंजुरी देत नसल्याने हा प्रस्ताव गेली सहा वर्षे लोंबकळत पडला आहे. त्याबद्दल दादूमामा ट्रस्टचे संस्थापक व माजी वायुसैनिक मुरलीधर देसाई हे सातत्याने पाठपुरावा करीत असूनही त्याकडे कोल्हापूरचे खासदार व अन्य लोकप्रतिनिधीही लक्ष द्यायला तयार नाहीत. एअर कमांडर सुनील कुमार यांनी देसाई यांना १९ जूनला पत्र पाठवून राज्य शासन यासाठी अजिबातच प्रतिसाद देत नसल्याचे कळविले आहे.

हवाईदल एनसीसीसाठी राज्य शासनाची नकारघंटा
कोल्हापूर : कोल्हापूरला हवाई दल (एअर विंग) एनसीसी सुरू करण्यास डायरेक्टर जनरल, एनसीसी यांनी तत्त्वत: मंजुरी दिली असतानाही, महाराष्ट्र शासन त्याला मंजुरी देत नसल्याने हा प्रस्ताव गेली सहा वर्षे लोंबकळत पडला आहे. त्याबद्दल दादूमामा ट्रस्टचे संस्थापक व माजी वायुसैनिक मुरलीधर देसाई हे सातत्याने पाठपुरावा करीत असूनही त्याकडे कोल्हापूरचे खासदार व अन्य लोकप्रतिनिधीही लक्ष द्यायला तयार नाहीत. एअर कमांडर सुनील कुमार यांनी देसाई यांना १९ जूनला पत्र पाठवून राज्य शासन यासाठी अजिबातच प्रतिसाद देत नसल्याचे कळविले आहे.
कोल्हापूरला एनसीसी ग्रुप हेटक्वार्टर १९६० पासून आहे. त्याअंतर्गत कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या या ग्रुप एनसीसीमध्ये आर्मीची आठ युनिट व एक नेव्ही विंग आहे.
नेव्ही विंग रत्नागिरीला असून तिचे प्रशिक्षण तिथे दिले जाते. एअर विंग एनसीसी सध्या पुण्यासह मुंबई व नागपूरला आहे. कोल्हापुरात फक्त प्रायव्हेट हायस्कूलमध्येच ही व्यवस्था आहे; परंतु ती अपुरी आहे. येथे एअर विंग एनसीसी नसल्याने या विभागातील विद्यार्थ्यांना एअर फोर्ससंबंधी पुरेशी माहिती मिळत नाही. उत्सुकता आणि क्षमता असल्याने महाविद्यालयांत चौकशी करूनही त्याचे काहीच प्राथमिक ज्ञान उपलब्ध होत नाही. त्यामुळे या पाच जिल्ह्यांतून एअर फोर्समध्ये फारशी भरती होत नाही.
देसाई यांनी यासंबंधी २०१५ पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चार वेळा पत्रे पाठविली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही चार-पाच वेळा भेट घेतली; परंतु त्यांना फारसा कोणी प्रतिसाद देत नाही. त्यांनी नवी दिल्लीतील डीजीएनसीसी कार्यालयाकडेही सातत्याने पत्रव्यवहार केला; परंतु जोपर्यंत राज्य शासन या प्रस्तावास मंजुरी देत नाही तोपर्यंत ही एनसीसी होऊ शकत नाही.
कोल्हापुरात एनसीसीची हवाई दलाची शाखा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना या क्षेत्राबद्दल माहिती मिळेल; परंतु राज्य सरकार याबाबत फारच उदासीन असल्याचा अनुभव गेली पाच-सहा वर्षे येत आहे.
- मुरलीधर देसाई
माजी वायुसैनिक, कोल्हापूर