दूध अनुदान वाढविले, पण माहिती भरण्याचे लॉगिनच बंद; राज्य सरकारचा सावळागोंधळ
By राजाराम लोंढे | Updated: November 28, 2024 13:11 IST2024-11-28T13:11:25+5:302024-11-28T13:11:59+5:30
बटर वधारले, पण ‘जीएसटी’ने परवडेना

दूध अनुदान वाढविले, पण माहिती भरण्याचे लॉगिनच बंद; राज्य सरकारचा सावळागोंधळ
राजाराम लोंढे
कोल्हापूर : राज्य सरकारने गाय दूध अनुदान खरेदीवर प्रतिलिटर सात रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली; पण अनुदानाची माहिती भरण्याचे लॉगिनच गेले महिनाभर बंद आहे. सप्टेंबरपर्यंतची माहिती भरली असून, ३० नोव्हेंबरला योजना संपणार आहे. आतापर्यंत ३६० कोटींचे अनुदान राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाटप केले असून, अजून किमान ५०० कोटींची गरज आहे.
गेले एक वर्ष गाय दुधाचे उत्पादन वाढले आणि मागणी कमी असल्याने दर घसरले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यांसाठी प्रतिलिटर तीन रुपयांचे अनुदान दिले. उन्हाळा असूनही दुधाच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळे जुलैपासून प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान दिले. निवडणुकीच्या तोंडावर ऑक्टोबरपासून सात रुपये अनुदान केले.
जुलै ते सप्टेंबरपर्यंतची दूध उत्पादकांची माहिती भरली आहे. त्याचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. या कालावधीतील गाय दुधाचे संकलन पाहता किमान ८५० कोटी रुपये अनुदानापोटी लागणार आहेत. त्याशिवाय ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचे पैसे राहणार आहेत. मात्र, या दोन महिन्यांची माहिती भरण्यासाठी सरकारचे लॉगिनच बंद आहे.
अनुदान मिळते म्हणून संघांकडून दरकपात
राज्य सरकारने गाय दुधाला प्रतिलिटर पाच वरून सात रुपये अनुदान जाहीर केले आणि राज्यातील दूध संघांनी गाय खरेदी दरात तीन रुपयांची कपात केली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर पावडर २३५ रुपयांवर
आंतरराष्ट्रीय पातळीवर गाय दूधपावडरीचा वधारला आहे. हा दर प्रतिकिलो २३० ते २३५ रुपये किलोपर्यंत आहे. मात्र, देशांतर्गत बाजारपेठेत अद्याप २१० रुपयांपर्यंतच दर आहे.
बटर वधारले, पण ‘जीएसटी’ने परवडेना
गाय व म्हैस बटरच्या दरांत वाढ होत आहे. सध्या गायीचे ३९० रुपये, तर म्हशीचा ४०० रुपयांच्या पुढे दर मिळत आहे. पण, त्यासाठी दूध संघांना तब्बल १२ टक्के जीएसटी द्यावा लागत असल्याने किलोमागे जीएसटीपोटी ४७ ते ४८ रुपये जात असल्याने सहकारी संघांची अडचण झाली आहे.