(राज्यासाठी) कोल्हापुरात अतिवृष्टीने उडवली दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:16 IST2021-07-23T04:16:14+5:302021-07-23T04:16:14+5:30
कोल्हापूर : गुरुवारी सकाळपर्यंत झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील सर्वच नद्या पात्राबाहेर पडल्या. सर्वच नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीने दुपारी ...

(राज्यासाठी) कोल्हापुरात अतिवृष्टीने उडवली दाणादाण
कोल्हापूर : गुरुवारी सकाळपर्यंत झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील सर्वच नद्या पात्राबाहेर पडल्या. सर्वच नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीने दुपारी इशारा पातळीवर ओलांडत ४३ फूट या धोका पातळीच्या दिशेने वेगाने झेपावत आहे. १०३ बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर ते रत्नागिरी, गगनबावडा, कागल-मुरगूड, गारगोटी, गडहिंग्लज, चंदगड असे प्रमुख राज्यमार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद झाले आहेत. पूरस्थिती निर्माण होत असल्याने एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. बर्की (ता. शाहूवाडी) गावाचा संपर्क तुटला असून संध्याकाळपर्यंत संपर्क तुटलेल्या गावांची संख्या आणखी वाढणार आहे.
ढगफुटीसदृश पाऊस
जिल्ह्यात मंगळवारपासून धुवाधार पाऊस कोसळत आहे. बुधवारपासून सुरू झालेला पावसाचा धिंगाणा गुरुवारी सकाळपर्यंत कायम होता. धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह डोंगराळ तालुक्यात तर ढगफुटीसदृश अवघ्या काही तासांतच विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. धुवाधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
रत्नागिरी, गगनबावडा, चंदगड मार्ग बंद
भुईबावडा, करूळ घाटात दर कोसळल्याने कोकणात जाणारी वाहतूक आंबोली व फोंडा घाटामार्गे वळवण्यात आली आहे. पण तेथे अनेक लहान-मोठ्या ओढ्यांवर पाणी आल्याने राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. आंबा घाटात रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. आजरा ते गारगोटी, उत्तूर ते गडहिंग्लज ते चंदगड मार्ग बंद आहे.
पंचगंगा इशारा पातळीवर
पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट आहे, तर इशारा पातळी ३९ फूट आहे. दुपारी दोन वाजता पंचगंगा नदीने ३९ फुटांची इशारा पातळी ओलांडली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गुरुवारी अतिवृष्टी कायम राहणार असल्याने शुक्रवारी पहाटेच ४३ फूट ही धोक्याची पातळी ओलांडेल, असा इशारा आहे.
पाऊस रविवारपर्यंत
पाऊस रविवारपर्यंत असाच कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पूर आणि दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
राधानगरी धरण ६६ टक्के भरले
राधानगरी धरण ६६ टक्के भरले आहे. ९७ टक्के भरल्याशिवाय धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडत नाही. त्यामुळे सध्या फक्त सांडव्यावरून भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाणीपातळीत वाढ होत आहे.
अलमट्टीतून ९७ हजार क्यूसेक विसर्ग
पाऊस वाढल्याने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सद्यस्थितीत प्रतिसेकंद ९७ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कोल्हापूर, सांगलीतील पंचगंगा, कृष्णेचे पाणी वेगाने पुढे सरकत आहे.