पंचनामे सुरू करा, २०१९ च्या पुरातील नुकसानीचे चौदा कोटी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:26 IST2021-07-30T04:26:31+5:302021-07-30T04:26:31+5:30
कोल्हापूर : गेल्या २०१९ च्या महापुरातील पंचनामे होऊन, नुकसानीची १३ कोटी ८४ लाखांची रक्कम निश्चित होऊनदेखील आता दुसरा महापूर ...

पंचनामे सुरू करा, २०१९ च्या पुरातील नुकसानीचे चौदा कोटी द्या
कोल्हापूर : गेल्या २०१९ च्या महापुरातील पंचनामे होऊन, नुकसानीची १३ कोटी ८४ लाखांची रक्कम निश्चित होऊनदेखील आता दुसरा महापूर आला, तरी अद्याप कृषीपंपधारक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ती तात्काळ द्या व यावर्षी आलेल्या महापुराची तीव्रता पाहता, झालेले नुकसान प्रचंड आहे. तातडीने त्याचे पंचनामे सुरू करा, अशी मागणी राज्य इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
२०१९ मध्ये महापुरात कृषीपंप चिखलात रुतले, काही वाहून गेले. ट्रान्सफॉर्मर व इलेक्ट्रिक साहित्यही मोडून पडले. तब्बल दोन महिने याच अवस्थेत राहिल्यानंतर त्याची जोडणी, दुरुस्ती व पंचनामे करण्यात आले. यात जिल्ह्यातील कृषी पंपधारकांचे १३ कोटी ८४ लाखांची रक्कम निश्चित करण्यात आली. याबाबत स्वत: एन. डी. पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही पुढाकार घेत मुख्यमंत्र्यांकरवी ही रक्कमही मंजूर करुन घेतली. पण अद्याप यातील एक रुपयादेखील शेतकऱ्यांना मिळालेला नाही.
शेतकऱ्यांनी, महावितरणने स्वत:च्या खर्चाने या सर्व दुरुस्त्या करून शेतीचा पाणीपुरवठा सुरू केला. या खर्चातून सावरत असतानाच आता पुन्हा एकदा २०१९ सारखा माेठा महापूर आला. तीन दिवसांच्या ढगफुटीसारख्या कोसळलेल्या पावसाने नदीकाठही खरवडून गेला आहे. यात पुन्हा एकदा कृषीपंप, ट्रान्सफॉर्मर, वायरी, पोल तुटून पडले आहेत. नदीकाठावर आता जाण्याचीही परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे जसा पूर ओसरेल तशी तातडीने महसूल यंत्रणेने पंचनाम्यांना सुरुवात करणे अपेक्षित आहे. ही कामे तातडीने करून मोडून पडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असल्याचेही किणीकर यांनी सांगितले.