सुवर्णपालखीचे काम सुरु

By Admin | Updated: August 10, 2015 01:09 IST2015-08-10T01:09:10+5:302015-08-10T01:09:10+5:30

महाडिक यांच्या हस्ते प्रारंभ : तब्बल चाळीस किलो सोन्याची गरज

Start of Gold Work | सुवर्णपालखीचे काम सुरु

सुवर्णपालखीचे काम सुरु

कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी सुवर्णपालखी ट्रस्टतर्फे श्री अंबाबाईला सोन्याची पालखी देण्यासाठी सुरू झालेल्या मोहिमेला वेग आला आहे. पालखीसाठी सोन्यापासून मोर्चेल, चवऱ्या आणि आबदारी तयार करण्याचे काम वाय. पी. पोवारनगर येथे रविवारपासून सुरू झाले. श्रीयंत्र तयार करून या कामाची सुरुवात झाली. ट्रस्टचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते कामास प्रारंभ झाला. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी मोर्चेल, चवऱ्या आणि आबदारी देवीच्या पालखीस देण्यात येतील, अशी माहिती ट्रस्टचे कार्याध्यक्ष भरत ओसवाल यांनी दिली. आतापर्यंत ट्रस्टकडे साडेआठ किलो सोने जमा झाले आहे. देवीची पालखी मढविण्यासाठी चाळीस किलो सोन्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नवरात्र उत्सवापर्यंत सध्या उपलब्ध असलेल्या सोन्याचा वापर करून मोर्चेल, आबदारी आणि चवऱ्या तयार करण्यात येणार आहे. वाय. पी. पोवारनगर येथील गणेश चव्हाण यांच्या वर्कशॉपमध्ये सुवर्णपालखीचे काम सुरू आहे. जसजसे सोने उपलब्ध होईल, तसतसे पालखीचे अन्य सुवर्णकाम करण्यात येईल, अशी माहितीही ओसवाल यांनी दिली. दरम्यान, सुवर्णसंकलनासाठी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी सुवर्णपालखी ट्रस्टतर्फे दुसरा कक्ष रविवारी जुना राजवाडा पोलीस स्टेशनशेजारी सुरू करण्यात आला आहे. देवीची पालखी सोन्याने मढविण्यासाठी ट्रस्टतर्फे भाविकांकडून चोवीस कॅरेट सोने आणि रोख स्वरूपातील देणगी स्वीकारण्यात येत आहे. आॅनलाईन देणगीची सोयही कॅनरा, कॉसमॉस, स्टेट बँक आॅफ इंडिया आणि रत्नाकर बँकांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. लवकरच मुंबई, दादर, डोंबिवली आणि ठाणे येथेही सुवर्ण संकलनासाठी देणगी केंदे्र स्थापन करण्यात येत आहेत.
श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी सुवर्णपालखी ट्रस्टमध्ये महालक्ष्मी बँकेचे संचालक भालचंद्र अष्टेकर, अंबाबाई पालखीचे हक्कदार बाळासाहेब जाधव यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात आले आहे. सुवर्णपालखी ट्रस्टच्या जुना राजवाडा येथील कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी सचिव महेंद्र इनामदार, के. रामाराव, जितेंद्र पाटील, निमंत्रित सदस्य सुरेश गायकवाड, नगरसेवक आर. डी. पाटील, श्रीपूजक शरद मुनीश्वर, महेश त्रिपाठी, राजाराम खाडे, त्यागराज शेट्टी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Start of Gold Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.