स्टार ९८१: अंगणवाडी सेविका म्हणतात, आधी शिकवा ना इंग्लिश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST2021-07-31T04:24:19+5:302021-07-31T04:24:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारासह इतर माहिती नोंदविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर हे ॲप ...

Star 981: Anganwadi worker says, teach English first! | स्टार ९८१: अंगणवाडी सेविका म्हणतात, आधी शिकवा ना इंग्लिश !

स्टार ९८१: अंगणवाडी सेविका म्हणतात, आधी शिकवा ना इंग्लिश !

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारासह इतर माहिती नोंदविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर हे ॲप देण्यात आले आहे. मात्र, यावर इंग्रजीतून माहिती भरावी लागत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाकडे याबाबत वारंवार कळवूनदेखील त्याची दखल घेतली जात नसल्याने अंगणवाडी सेविका वैतागल्या आहेत. आता त्यावर प्रशिक्षणाचा उतारा शोधला जात असला तरी इंग्रजीचा गंधही नसलेल्या ज्येष्ठ सेविकांची यामुळे मोठी गोची झाली असून, त्यांना इतरांच्या मदतीवर विसंबून राहावे लागत आहे.

अंगणवाडीमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची आधी हातीच रजिस्टरमध्ये नोंदणी केली जात होती. यावरुन त्या नोंदींच्या पारदर्शीपणाबाबत शंका घेतल्या जात असल्याने केंद्र सरकारने पोषण ट्रॅकर ॲप तयार करुन त्याचा वापर सक्तीचा केला. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना ॲन्ड्राॅईड मोबाईल डाटा पॅकसह उपलब्ध करुन दिले. हे ॲप सुरु झाल्याने माहिती काही क्षणात भरणे सोपे झाले, माहिती संकलनाचा वेग वाढला, त्याचे एकत्रिकरणही लगेच करणे शक्य झाले. हे सर्व फायदे असतानाच या ॲपमध्ये माहिती भरण्याच्या भाषेवरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. फक्त इंग्रजीतूनच माहिती भरावी लागत असल्याने भाषेच्या अज्ञानामुळे घोळ होत आहेत. मुळात नवीन अंगणवाडी सेविकांचा अपवाद वगळला तर चाळीशी, पन्नाशी ओलांडलेल्या सेविकांना इंग्रजी भाषेचा गंधच नाही. याबाबत या सेविकांनी जिल्हा परिषदेकडे तक्रारही केली आहे, पण हे केंद्र सरकारचे ॲप देशपातळीवर एकच असल्याने त्यात बदल करण्याचे अधिकार राज्यांना नाहीत. केंद्रानेच प्रादेशिक भाषेचा पर्याय दिला तरच यातून मार्ग निघू शकणार आहे.

१) जिल्ह्यातील अंगणवाड्या - ४३६९ (ग्रामीण ३९९४, शहरी ३७५)

एकूण अंगणवाडी सेविका - ४३६९

२) पोषण ट्रॅकरवरील कामे : अंगणवाडीत मिळणाऱ्या आहाराची लाभार्थी असलेली ० ते ६ वयोगटातील बालके, ११ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य किशोरवयीन मुली, स्तनदा माता, गरोदर महिला यांना आहार वाटप, लसीकरणासह इतर आरोग्यविषयक उपक्रमांबाबतची माहिती रोजच्या रोज भरणे.

३) मोबाईलची अडचण वेगळीच

मोबाईल न चालणे, रेंज न मिळणे या अडचणींशी सामना करतच अंगणवाडी सेविका पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरत आहेत. आता तर पावसाळ्यामुळे मोबाईल नेटवर्कच्या अडचणींचे प्रमाण वाढले आहे.

४) भाषेच्या अडचणीवर प्रशिक्षणाचा उतारा

पोषण आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्वी असलेल्या कॅस ॲपमध्ये इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषेचा पर्याय होता. या ॲपमध्ये मात्र तो पर्याय नसल्याने माहिती भरण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने सेतूमार्फत सेविकांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेतले आहे. शिरोळमधील एक प्रकल्प वगळता संपूर्ण जिल्ह्यात हे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, सेविका माहिती भरण्याचे नवे तंत्र शिकून घेत आहेत.

५) प्रतिक्रिया : सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

पोषण ट्रॅकर ॲपमधील भाषेचा अडसर कसा अडचणीचा ठरत आहे, याबाबत आलेल्या सेविकांच्या तक्रारी शासनाकडे कळविल्या आहेत. त्यांच्याकडून राज्य पातळीवरचे धोरण ठरेपर्यंत काम थांबू नये म्हणून ऑनलाईन प्रशिक्षण दिले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Web Title: Star 981: Anganwadi worker says, teach English first!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.