अधिसभेत खडाजंगी

By Admin | Updated: December 24, 2014 00:20 IST2014-12-23T23:57:20+5:302014-12-24T00:20:40+5:30

अधिकतर ठराव घेतले मागे; महाविद्यालय तपासणीच्या स्वतंत्र समितीला नकार

Standing in the upper house | अधिसभेत खडाजंगी

अधिसभेत खडाजंगी

कोल्हापूर : विनाअनुदानित जादा तुकड्या दिलेल्या महाविद्यालयांच्या तपासणीसाठीच्या स्वतंत्र समिती नेमण्याच्या मुद्द्यावरून आज, मंगळवारी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत वादळी चर्चा झाली. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) आणि शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी यांच्यात अर्ध्या तासाहून अधिक वेळच्या खडाजंगीनंतर अखेर ठराव मागे घेण्यात आला. तब्बल साडेसहा तासांच्या अधिसभेसमोर ३३ ठराव मांडण्यात आले. त्यापैकी १२ मान्य, दोन अमान्य, तर १५ ठराव मागे घेण्यात आले.
अधिसभेत २०१४-१५ मध्ये विद्यापीठ संलग्नित ज्या महाविद्यालयांना पदवीच्या प्रथम वर्षासाठी जादा तुकड्या मंजूर केल्या आहेत, त्यांच्या तपासणीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याबाबतचा ठराव ‘सुटा’च्या डॉ. सविता धोंगडे यांनी मांडला. त्याला विकास आघाडीच्या प्रताप माने यांनी विद्यार्थिहित लक्षात घेऊन जादा तुकड्या मिळविल्या आहेत. त्यामुळे तपासणी समिती नेमण्यात येऊ नये, असे सांगत विरोध केला. अनिल घाटगे यांनी त्याला पूरक मत मांडले. त्यावर ‘सुटा’च्या आर. एच. पाटील यांनी शुल्काच्या तुलनेत विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्याचे वास्तव मांडले. ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. अर्जुन राजगे यांनी विद्यापीठाकडून अशी समिती कार्यरत असल्याने पुन्हा समिती नेमणे गरजेचे नसल्याने स्पष्ट केले. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी संबंधित ठरावावर मतदान घेतले. यात ४१ विरुद्ध नऊ अशा मतांनी ठराव अमान्य झाला. पेठवडगावमधील एका शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील ग्रंथपालाच्या आॅक्टोबर २०१० पासूनच्या
थकीत वेतनाची तक्रार कुलपतींना करण्याचा ठराव डॉ. एस. ए. बोजगर यांनी मांडला. तो अमान्य
झाला. (प्रतिनिधी)


त्रुटी दुरुस्त करण्याच्या ग्वाहीनंतरच अहवाल मंजूर
लेखापरीक्षक बदलाच्या मागणीसह सॅलरी अ‍ॅडव्हॉन्स, वाहनभत्ता, दूरशिक्षण केंद्रातील स्वयंअध्ययन साहित्यावरील खर्च, आदींबाबत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) अधिसभा सदस्यांनी त्रुटी दाखविल्या. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने संयुक्तिक स्पष्टीकरण देत त्रुटींच्या दुरुस्तींची ग्वाही दिल्यानंतरच सन २०१३-१४ चे ताळेबंदपत्रक व लेखापरीक्षण अहवाल अधिसभा सदस्यांनी मंजूर केला.
ताळेबंदपत्रक व लेखापरीक्षण अहवाल मान्यतेचा ठराव मांडण्यात आला. त्यावर ‘सुटा’च्या डॉ. आर. एच. पाटील यांनी लागेबंध निर्माण होऊ नयेत, यासाठी लेखापरीक्षक बदला, अशी मागणी केली. डॉ. अशोक कोरडे यांनी देखभाल-दुरुस्तीचा खर्च फुगवून दाखविला असल्याचे मत मांडले. त्यावर विद्यापीठातर्फे डॉ. डी. टी. शिर्के यांनी देखभाल-दुरुस्तीचा खर्च १० ते १५ टक्के असतो. त्यामुळे फुगवून दाखविण्याचा प्रयत्न नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर झाला.
दरम्यान, ठरावांपूर्वी प्रश्नोत्तराचा तास झाला. यात विद्यापीठातील सहायक उपकुलसचिव, उपकुलसचिव पदांची वेतनश्रेणी, महागाव आणि अर्जुननगर येथील महाविद्यालयांच्या गैरकारभाराची चौकशी, मिरज येथील एका महाविद्यालयातील शिक्षकांनी वेतनवाढ रोखणे व वेतन न देण्याबाबतच्या केलेल्या तक्रारी, कोतोली येथील महाविद्यालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळविलेले अनुदान, ऐतवडे खुर्द येथील महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य पदाबाबतच्या अशा सहाच प्रश्नांवर चर्चा झाली. यावरून प्रश्नोत्तराचा तास निष्फळ ठरल्याचे दिसून आले.

मान्य झालेले ठराव
ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील महाविद्यालयाच्या चौकशीसाठी नवीन समिती नेमणे
विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांत किमान पाचशे झाडांचे रोपण व्हावे.
पीठासन अधिकारी यांच्या नियुक्तीबाबत कुलगुरूंनी पाठपुरावा करावा.
दूरशिक्षण केंद्राच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती व्हावी.
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवासस्थाने बांधावीत.


मागे घेतलेले ठराव
अधिसभेची सुरुवात व समारोप राष्ट्रीय गीतांनी व्हावा.
जादा शुल्क आकारणीच्या चौकशीसाठी समिती नेमणे
विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकांसाठी मतदारांची यादी छायाचित्रासह तयार करणे.
शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची
सर्व शुल्क विनाअट माफ करावी.

एपीआय गुणांकनासाठी
स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत.

Web Title: Standing in the upper house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.