उसाला पुन्हा लोकरी माव्याचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:24+5:302021-07-19T04:16:24+5:30
आयुब मुल्ला लोकमत न्यूज नेटवर्क खोची : परिपक्व होत असलेल्या उसाला लोकरी माव्याचा विळखा पडत चालल्याने हिरवागार पाला काळाकुट्ट ...

उसाला पुन्हा लोकरी माव्याचा विळखा
आयुब मुल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : परिपक्व होत असलेल्या उसाला लोकरी माव्याचा विळखा पडत चालल्याने हिरवागार पाला काळाकुट्ट होत चालला आहे. शेतकरी औषधाची फवारणी करून हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी धडपड करू लागला आहे. गावागावांतील एकूण क्षेत्रांपैकी ३० टक्के उसाचे क्षेत्र माव्याच्या प्रादुर्भावाने बाधित झाले आहे. तीन वर्षांनंतर झपाट्याने या रोगाने डोके वर काढले असल्याने बळिराजा धास्तावला आहे.
गतवर्षीच्या जून, जुलै महिन्यांत आडसाली लागण केलेले ऊस पीक जोमाने आले आहे. शेतकरी नियोजनबद्ध पद्धतीने वेळच्या वेळी शेती कामे करू लागल्याने उसाचे क्षेत्र फायदेशीर ठरावे अशा अवस्थेत आहे, पण हाच ऊस गेल्या पंधरा-वीस दिवसांत लोकरी माव्यामुळे अशक्त बनत चालला आहे. हिरवीगार पाने सुरुवातीला पांढरी धोट बनून ती काळी होताना दिसत आहेत. सुरुच्या लागणीचीही अवस्था अशीच होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
नैसर्गिक वातावरण दिवसाला बदलत आहे. उष्णता निर्माण होते आणि पुन्हा गारवा पसरतो. दमट हवामान तयार होऊन किडीच्या वाढीला वाव मिळण्यास मदत होत आहे. मान्सूनची प्रति दिवस गतिमानता वाढत नाही. एकूणच उसावर लोकरी मावा वाढण्यास पूरक वातावरण निर्माण झाले आहे.
उसाच्या पानाच्या पाठीमागे मध्य शिरेच्या दोन्ही बाजूला दाटीवाटीने व एकमेकांच्या अंगावर ही कीड बाल्यावस्थेत बसलेली प्रारंभीच्या टप्प्यात दिसून येत आहे. त्यानंतर पानाच्या इतर भागात पसरून पानेच ठिसूळ बनत चालली आहेत. पानाच्या कडा कोरड्या होऊन संपूर्ण पाने कोरडी बनत आहेत. पाने काळी पडू लागली आहेत.
विशेष म्हणजे रस शोषल्यामुळे ऊस कमकुवत होऊन वाढ खुंटण्याची भीती जाणवू लागली आहे. सध्याचे लोकरी माव्याचे प्रमाण पाहता एकरी पाच-सहा टन तरी तुटीची शक्यता आहे. वातावरण असे पोषक राहिल्यास प्रमाण वाढू शकते. त्यामुळे आर्थिक नुकसानीचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोट....
आडसाली लावणीची सुरुवातीपासूनच वाढ चांगली होत गेली. खताची मात्रा, औषधांची फवारणी, मशागत योग्यवेळी केली. गतवर्षीपेक्षा उत्पादन वाढेल असे प्रयत्न केले आहेत, पण हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे माव्याचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे नुकसानीची भीती वाटत आहे.
शशिकांत पाटील-शेतकरी(लाटवडे)
अडसाला, सुरू लागणीवर माव्याचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शेतकऱ्यांनी क्लोरोपायसिस, सायपरमेथ्रीन या कीटकनाशकाची फवारणी करावी. जैविक किडी पानांवर सोडावी. या किडी मावा फस्त करतात.
मदन अनुसे- ऊसशेती मार्गदर्शक (बुवाचे वाठार)