क्रीडा संकुलाचे काम थांबले
By Admin | Updated: July 19, 2014 00:26 IST2014-07-19T00:25:51+5:302014-07-19T00:26:46+5:30
विभागीय आयुक्तांच्या ‘डेडलाईन’ला हरताळ : तिसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही भाववाढीचा मुद्दा पुढे

क्रीडा संकुलाचे काम थांबले
कोल्हापूर : तिसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही भाववाढीच्या मुद्द्यावरून विभागीय क्रीडा संकुलाचे काम पुन्हा थांबले आहे. संकुलाच्या कामाचा खेळखंडोबा थांबावा, यासाठी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी बिले अदा करून ठेकेदाराला पहिल्या टप्प्यातील कामांच्या पूर्ततेसाठी फेब्रुवारी अखेरच्या दिलेल्या ‘डेडलाईन’ला हरताळ फासला गेला आहे.
तांत्रिक अडचणी आणि सुधारित अंदाजपत्रकाची लांबलेली मंजुरी यामुळे विभागीय आयुक्त देशमुख यांनी दिलेली फेब्रुवारी अखेरची ‘डेडलाईन’ उलटल्याचे ठेकेदार आणि क्रीडा विभागाकडून सांगण्यात येत आहे. सध्या संकुलाच्या पहिल्या टप्प्यातील खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल मैदानाचे काम पूर्ण झाले आहे.
फुटबॉल मैदान अंतर्गत रस्ते, ४०० मीटर धावणे मार्ग, टेनिस कोर्ट, अंतर्गत रस्ते, पाणी व्यवस्था तसेच संरक्षक भिंतीचे काम अर्ध्यावरच आहे. थकलेले बिल आणि भाववाढीच्या मुद्द्यांवरून मार्च २०१४ पासून संकुलाचे काम ठेकेदाराने थांबविले आहे. विभागीय क्रीडा संकुलासाठी २९ कोटींचा प्रस्ताव होता; पण संकुलातील कामात काही अतिरिक्त बाबींचा समावेश केल्याने एकूण खर्च ३६ कोटी ८२ लाखांपर्यंत होणार आहे.
त्याबाबतच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली आहे. विभागीय संकुल समितीने राज्य क्रीडा विकास समितीला आॅगस्टमध्ये हे अंदाजपत्रक सादर केले. या समितीने त्यात त्रुटी दाखविल्या. त्यांची पूर्तता करून पुन्हा हे अंदाजपत्रक सप्टेंबरमध्ये संबंधित समितीकडे पाठविले. १९ मार्चला त्याला राज्य क्रीडा विकास समितीने मंजुरी दिली. त्यामुळे आता निधीचा प्रश्न मिटला आहे.
निधीचा प्रश्न नसला, तरी भाववाढीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्याबाबत विभागीय आयुक्तांकडून स्पष्टपणे माहिती मिळाल्याशिवाय संकुलाचे काम पूर्ववत सुरू होण्याचे चित्र सध्यातरी दिसत नाही. (प्रतिनिधी)
आयुक्तांच्या
उत्तराची प्रतीक्षा
संकुलाच्या कामाच्या सद्य:स्थितीची माहिती देण्यासह भाववाढीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बैठक घ्यावी याबाबतचे पत्र विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांना गेल्या चार दिवसांपूर्वी विभागीय क्रीडा संकुल समितीने पाठविले आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या उत्तराच्या प्रतीक्षेत समिती आहे.