महोत्सवी वर्षात देखाव्याची सत्तरी
By Admin | Updated: September 25, 2015 00:31 IST2015-09-25T00:30:53+5:302015-09-25T00:31:39+5:30
सावंतवाडीतील हरमलकर बंधू : चलचित्र देखाव्याची परंपरा आजही कायम

महोत्सवी वर्षात देखाव्याची सत्तरी
अनंत जाधव -सावंतवाडी हरमलकर बंधंूचा यावर्षीचा गणपती उत्सव म्हणजे त्यांच्यासाठी वेगळीच पर्वणी आहे. गणपती स्थापनेचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच ते देखाव्याची सत्तरी साजरी करत आहेत. गेली सत्तर वर्षे त्यांनी वेगवेगळे देखावे करून सिंधुदुर्गमधीलच नव्हे, तर गोव्यातील भाविकांना आपल्या कलाकृतीतून खिळवून ठेवण्याचे काम केले आहे. सन १९४६साली व्ही. शांताराम यांच्या सिनेमावर आधारित पहिला अनोखा असा दुष्यंत आणि शकुंतलाचा देखावा केला आणि नंतर त्यांच्या कलेला मिळालेल्या प्रतिसादामुळे त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
सावंतवाडी येथील शंकर हरमलकर यांनी सन १९४१पासून आपल्या उभाबाजार येथील निवासस्थानी गणपतीची स्थापना करण्यास सुरूवात केली. या गणपतीच्या स्थापनेत त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. पण सन १९४५साली शंकर हरमलकर यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा महादेव हरमलकर यांनी सन १९४६पासून स्वत: पुढाकार घेतला. त्यावेळी ते त्याकाळची मॅट्रीक म्हणजे इयत्ता सहावीमध्ये होते. त्यांनी गणपती स्थापनेत अनोखी युक्ती शोधली व गणपतीपुढे चलचित्र देखावे करायचे, असा निश्चय बांधला. पण परिस्थिती गरिबीची, देखाव्यासाठी लागणारे साहित्य कोठून आणायचे, विकत घेतले तर त्याला पैसे कोठून द्यायचे, असे वेगवेगळे प्रश्न त्यांना पडू लागले. पण त्याचकाळात त्यांची आई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि पोकळे यांच्या कारखान्यात विडी वळून मिळालेले दहा रूपये त्यांनी आपल्या मुलाला दिले आणि आपण देखावा साकारला, असे महादेव हरमलकर सांगतात.
सन १९४६साली पहिला देखावा त्यांनी साकारला तो दुष्यंत व शकुंतलेचा. तेव्हा व्ही. शांताराम यांचा सिनेमा प्रथमच आला होता आणि चांगला गाजलाही होता. त्यातील प्रतिकृती घेत हा देखावा सादर केला होता. या देखाव्याला चांगला प्रतिसादही लाभला. त्यांना त्यावेळी त्यांचे वर्गमित्र सदाशिव रांगणेकर यांनी साथ दिली. त्यांनी हुबेहूब असे पडद्यावर नक्षीकाम करत त्या कलाकृतीत आणखी रंग भरले. या पहिल्या देखाव्यावेळी महादेव हरमलकर यांचे वय अवघे १६ वर्षे होते व त्यांना आधारही कोणाचा नव्हता. असे असतानाही त्यांनी कधीही मागे वळून न पाहता गेली सत्तर वर्षे देखावे करण्याचे काम अविरत सुरूच ठेवले आहे.
या सत्तर वर्षांच्या काळात कालियामर्दन, समुद्रमंथन, गंगावतरण, अष्टविनायक, शरपंजरी भीष्म, कृष्णलिला असे वेगवेगळे देखावे साकारत भाविकांना कायमच खिळवून ठेवले. हरमलकर बंधूंचे वैशिष्ट्य म्हणजे आत्तापर्यंत महाभारतातील वेगवेगळे देखावे त्यांनी साकारले आहेत.
महादेव हरमलकर आज गणपतीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना वयाच्या ८६ व्या वर्षीही त्याच निश्चयाने गणपतीला वेगवेगळे देखावे सादर करत आहेत. ते नोकरीनिमित्त अनेक वर्षे मुंबईला होते. पण गणपतीकाळात कुठेही असले तरी पंधरा दिवसांची सुट्टी काढून ते देखावे साकारण्यासाठी गावी येत असत. पण सध्या ते वयोमानानुसार सल्लागाराच्या भूमिकेत असून, त्यांच्या या कार्याला जोड देत आहेत त्यांचे तीन मुलगे मिलिंद हरमलकर, विश्वजीत हरमलकर, उष्कांत हरमलकर. हे तिघेही त्यांना देखावे सादर करण्यासाठी मदत करत आहेत. विश्वजीत हे तर मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी विविध देखावे करतात. त्यांच्या कलाकृती पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून लोक येत असतात.
मध्यरात्री देखावा पाहण्यासाठी सहल
‘शरपंजरी भीष्म’ हा देखावा पाहण्यासाठी वीस वर्षांपूर्वी तर मध्यरात्री अडीच वाजता मुंबईहून विद्यार्थांची सहल आली होती आणि हे विद्यार्थी पहाटे ४ वाजेपर्यंत हा देखावा पाहण्यात दंग होते. अशा अनेक आठवणी महादेव हरमलकर यांनी यावेळी सांगितल्या.