नाद
By Admin | Updated: January 17, 2017 01:13 IST2017-01-17T01:13:30+5:302017-01-17T01:13:30+5:30
नाद

नाद
नाद
द’ हा शब्द ताल, लय या अर्थाने वापरला जातो. संगीताच्या बाबतीत हा अर्थ योग्यही आहे. मात्र, ‘नाद’ या शब्दाचा आणखी एक वेगळा अर्थ आहे. नादाला लागणे हा वाक्प्रचार वापरला की त्याचा अर्थ पुन्हा वेगळा निघतो. ‘नाद नाही करायचा’ यातील ‘नाद’ शब्दाच्या छटा वेगळ्या. मात्र, या ठिकाणी आपण नादाला लागल्यानंतर काय होते आणि मग केवळ एकट्याचेच नाही तर अख्ख्या घरादाराचं जगणं कसं मुश्कील होतं याची काही उदाहरणे पाहणार आहोत.
घटना १ - सोमवारी पेपर स्टॉलवर गेलो होतो. तिथेच पेपर घेण्यासाठी पन्नाशीचे गृहस्थ आले. पेपर घेईपर्यंत त्यांचा मित्र आला. त्याला नीट उभं राहता येत नव्हतं. त्यानं नमस्कार केला. यांनी त्याच्याकडे पाहिलं. काय अवस्था करून घेतलाईस मर्दा. एकतर्फी बोलणं सुरू झालं. शाण्या, तू आम्हाला शिकवायचं का आम्ही तुला. घरचं चांगलं. बायको पोरं नीट हाईत आणि तू न्हाई ते करत फिरतईस. तुला लाज वाटत नाही व्हय रे... समोरचा मित्र तसाच उभा. शून्यात पाहिल्यागत. त्यानं तोंडातून एकही शब्द काढला नाही. एवढं ऐकून निघून गेला. त्याची ती अवस्था पाहिल्यानंतर त्याच्या घराची आणि घरात राहणाऱ्यांची काय कुचंबणा होत असेल याची जाणीव होते. हा झाला ‘दारूचा नाद’.....
घटना २ - याचे वडील सरकारी खात्यात मोठ्या पदावर होते. दोन मुलींच्या पाठीवर हा मुलगा. घरदार, शेतीवाडी सगळं बयाजवार. सगळंच व्यवस्थित, पण मित्र धड नव्हते. बसायची सवय लागली. दिवसा-ढवळ्या सुरू झालं. आपल्याकडं असं काही झालं की लग्न करतात. सुधारेल म्हणून. म्हणजे घरातल्या त्रासात दुसऱ्याची पोर वाटेकरी व्हायला आणल्यातला प्रकार. तो काही सुधारला नाही. ती दोन पोरं सांभाळत गावाकडं. गावाकडं आला की पुन्हा त्याच घोळक्यात रमतो म्हणून त्याला बाहेरच नोकरीसाठी ठेवलेला. घरचं सगळं धड असून ही अशी तऱ्हा ‘दारूच्या नादा’पायी....
घटना ३ - शिक्षक दाम्पत्याचा मुलगा. वाणिज्य शाखेतील पदवीधर. एका पतसंस्थेत व्यवस्थापक होता. नंतर नोकरी सोडली. सगळं नीट चाललेलं. नोकरी सोडल्यानं बसून काय करायचं. आॅनलाईन लॉटरीतून दुप्पट पैसे मिळत असल्याचं कळलं. सुरुवात झाली. सुरुवातीला पाच-सहा महिने दुप्पट पैसे मिळाले. बी.कॉम. दोन वर्षांत एक, दोन नव्हे तब्बल ४५ लाख रुपये आॅनलाईन लॉटरीत घालवले. राहतं घर विकायची वेळ आली. पोट मारून, हौसमौज न करता गाठीला साठविलेले पैसे रोजच्या जगण्यासाठी वापरण्याची वेळ आली. ‘आॅनलाईन लॉटरीच्या नादा’चा हा परिणाम......
घटना ४ - हा बहाद्दर आर्किटेक्चर. नेहमी मोठं बोलायची सवय. शिक्षिका असलेली बायको. यानं कधी फार मोठं काही काम केलं अशातला भाग नाही. गावाकडं शेतीवाडी. त्यालाही परदेशातील कुठल्या स्कीमचा वास लागला. ७५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यानंतर दहा कोटी रुपये मिळणार असल्याची ही कसली स्कीम होती. आतापर्यंत ५० लाख भरता-भरता रूतायला लागला. पदरात शिकणारी दोन पोरं. खोटं बोलायची वेळ यायला लागली. शेती विकायला काढावी लागलं. एका वेगळ्याच दबावाखाली आख्खं कुटुंब जगतंय. परदेशातील कोट्यवधीची वाट पाहत..
घटना ५ - पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणी व्यक्तिमत्त्व. पाच मुलींच्या पाठोपाठ हा झाला. घरात बक्कळ पैसा, त्यामुळं चिरंजीवांना मित्रमंडळी जास्त. त्यात अर्क असलेली मोजकीच; पण त्यांनी याचा ताबा घेतला. करू नयेत ते सगळे नाद. परिणाम व्हायचा तोच झाला. तब्येत खालावण्यास सुरुवात झाली. सगळं माहीत असूनही आपला नेहमीचा फॉर्म्युला. लग्न लावून दिलं. मुलगीही झाली; पण हा गेला. जाता-जाता तिला आजाराची देणगी देऊन गेला. उद्ध्वस्त झालेल्या, होत असलेल्या घरांची ही प्रातिनिधिक उदाहरणं. काही जणांना कष्ट, दु:ख सोसत नाही म्हणून ते नादाला लागतात आणि काही जणांना सुख बोचायला लागतं म्हणून ते नादाला लागतात. कुणी, कुणाला दोष द्यायचा.
- समीर देशपांडे