क्षमस्व, साखर सहसंचालक कार्यालय बंद आहे...शिवसेनेने लावला फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 15:45 IST2018-10-31T15:39:45+5:302018-10-31T15:45:19+5:30
आंदोलनाची पुर्वकल्पना देउनही प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ रजेवर गेल्याने चिडलेल्या शिवसैनिकांनी क्षमस्व, साखर सहसंचालक कार्यालय बंद आहे, उस दरासाठी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधावा अशा आशयाचा फलक कार्यालयाच्या दारात लावून रोष व्यक्त केला. रावळ यांच्या विरोधात कार्यालयासमोर जोरदार घोषणाही दिल्या.

क्षमस्व, साखर सहसंचालक कार्यालय बंद आहे...शिवसेनेने लावला फलक
कोल्हापूर: आंदोलनाची पुर्वकल्पना देउनही प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ रजेवर गेल्याने चिडलेल्या शिवसैनिकांनी क्षमस्व, साखर सहसंचालक कार्यालय बंद आहे, उस दरासाठी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधावा अशा आशयाचा फलक कार्यालयाच्या दारात लावून रोष व्यक्त केला. रावळ यांच्या विरोधात कार्यालयासमोर जोरदार घोषणाही दिल्या.
जिल्हा शिवसेनेतर्फे बुधवारी लक्ष्मीपुरीतील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर उस दराच्या प्रश्नावर जागर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हलगी, डफ वाजवत आईसाहेब महाराज चौकातून मोर्चास सुरुवात झाली.
साखर सम्राट आणि सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत एकच्या सुमारास साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा पोहचला. कार्यालयात प्रादेशिक साखर सहसंचालक उपस्थित नसल्याचे कळताच शिवसैनिक आक्रमक झाले.
रावळ यांच्यावतीने प्रभारी साखर उपसंचालक डी.एस.खांडेकर यांनी खाली येउन निवेदन स्विकारण्याची तयारी दर्शवली, पण विजय देवणे यांनी रावळ आंदोलनादिवशीच कसे रजेवर जातात, त्यांचे काय करायचे अशी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सर्व शिवसैनिकांनी सोबत आणलेला फलक कार्यालयाच्या गेटवर लावून रावळ यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
यावेळी मुरलीधर जाधव, उत्तम पाटील, संभाजी भोकरे, नामदेव गिरी, सुजित चव्हाण, मधूकर पाटील, दुर्गेश लिंग्रस, राजू जाधव आदि उपस्थित होते.