चांगला सूर गवसण्यात वेगळीच धुंदी
By Admin | Updated: January 13, 2016 01:12 IST2016-01-13T00:42:48+5:302016-01-13T01:12:13+5:30
सलील कुलकर्णी : सी. जी. कु लकर्णी वाङ्मय मंडळाच्या व्याख्यानमालेत प्रकट मुलाखत; श्रोत्यांची अलोट गर्दी

चांगला सूर गवसण्यात वेगळीच धुंदी
कोल्हापूर : ‘एखादं गाणं, कविता सूचणे ही प्रक्रिया फार आनंददायी असते. चांगला सूर गवसण्यात धुंदी असते. त्यामुळे मिळणारे समाधान अध्यात्मातील समाधानाइतकेच श्रेष्ठ असते’ अशा शब्दांत ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ या गीताचे लेखक, संगीतकार, गायक, डॉ. सलील कुलकर्णी यांनी आपल्या जीवनातील संगीताचे महत्त्व विशद केले.
येथील न्यू एज्युकेशन सोसायटी, संचलित सी. जी. कुलकर्णी वाङ्मय मंडळा व्याख्यानमालेत संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत मंगळवारी राम गणेश गडकरी सभागृहात आयोजित करण्यात आली. तेव्हा त्यांनी श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधला. विक्रांत देशमुख यांनी त्यांना बोलते केले. यावेळी
सभागृह खचाखच भरले होते.
डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘संगीत, लिखाण, गायन ही समर्पणाची गोष्ट असते. स्वत:ला सिध्द करायला जाऊ नये, शक्य तितके चांगले करण्याचा प्रयत्न करावा. एखादे गाणे, भावगीत, कविता सुचण्याचे क्लासेस नसतात. त्यासाठी प्रतिभा असणे गरजेचे असते आणि प्रतिभा उत्सुकतेपोटी अधिक बहरत जाते. उत्सुकता संपली की नवीन काही सूचण्याची प्रक्रिया संपते. सुचण्याची प्रक्रिया ही त्या कलाकाराची स्वत:च्या मालकीची असते. ती त्याच्याकडून कोणी काढून घेऊ शकत नाही. जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करावी वाटते तेव्हा के ली की ती जास्त चांगली बनते. ’
बालक-पालक संबंधावर बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाले, आपण मुलांच्या मनात भीती निर्माण करण्यास जबाबदार असतो. त्याला अंधाराची भीती घालतो. त्याने चिखलमातीत खेळू नये म्हणून महागडी खेळणी आणून देतो. आपण त्यांच्यासाठी देश, राज्य, धर्म, जातीच्या सीमा आखतो आणि त्यांना संकुचित बनवतो. प्रत्येकवेळी आपण त्यांना देत राहतो. त्यांनाही काही नवीन गोष्टी सांगायच्या असतात, त्यादेखील ऐकून घ्यायला हव्यात. मुलांकडून जास्त अपेक्षा न ठेवता त्यांना मुलांसारखं मोठं होऊ द्यावं, नाहीतर ती कोमेजतात.
यावेळी सी. जी. कुलकर्णी गीतगायन, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. स्नेहा फडणीस यांनी केले. प्रास्ताविक चित्रा कशाळकर यांनी केले. यावेळी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष नितीन वाडीकर, उपाध्यक्ष एस. के. कुलकर्णी, मदनमोहन सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, पद्माकर सप्रे, आदी उपस्थित होते.
कविता सादर
मुलाखतीवेळी संगीतकार
डॉ. सलील कुलकर्णी यांनी कवी ग्रेस, आरती प्रभू, बा. भ. बोरकर, शांता शेळके, अरुणा ढेरे यांच्या कवितेतील काही ओळी सादर केल्या. उपस्थित रसिकांनी यावेळी टाळ्यांच्या कडकडाटात कवितांना दाद दिली.