सुताच्या सट्टेबाजीने यंत्रमागधारक हैराण

By Admin | Updated: January 4, 2016 00:47 IST2016-01-03T21:39:14+5:302016-01-04T00:47:40+5:30

भाववाढ सुरू : कापडाला मागणी येताच पुन्हा अस्थिरता; कापसातही प्रतिखंडी एक हजार ते दीड हजारपर्यंत दरवाढ

Soota betting machine hanger | सुताच्या सट्टेबाजीने यंत्रमागधारक हैराण

सुताच्या सट्टेबाजीने यंत्रमागधारक हैराण

राजाराम पाटील -- इचलकरंजी --वर्षभराच्या आर्थिक मंदीनंतर कापडाला थोडासा उठाव आला आहे. त्यामुळे येथील वस्त्रोद्योगाला चांगले दिवस येण्याची आशा असताना सुताच्या भावातील अस्थिरतेने यंत्रमागधारकांना ग्रासले आहे. अवघ्या पंधरवड्यात सुताच्या भावात प्रतिकिलोस ४० रुपये वाढ झाल्याने वस्त्रोद्योगात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे.
केंद्रामध्ये नवीन सरकार आल्यावर वस्त्रोद्योगाला ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा या उद्योगातील सर्वच घटकांना होती. गुजरातमध्ये वस्त्रोद्योगाचा व्याप अधिक असून, सुरत व अहमदाबाद या दोन कापडाच्या मोठ्या बाजारपेठा आहेत. अशा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांची वस्त्रोद्योगावर ‘मेहरनजर’ राहील, अशी सर्वांना आशा होती. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातही भाजप सरकार सत्तेवर आल्यामुळे या उद्योगातील सर्वच घटकांच्या अपेक्षा उंचावल्या.
मात्र, गेल्या वर्षभरात केंद्र आणि राज्यातील सरकारने वस्त्रोद्योगाकडे दुर्लक्षच केले. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात कोणताही दिलासा मिळाला नाही. देशात निम्म्याहून अधिक यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत, तर अशा वस्त्रोद्योगावर सुमारे एक कोटीहून अधिक लोक अवलंबून असूनसुद्धा महाराष्ट्राच्या सरकारने वाढलेल्या वीजदराबाबत वारंवार आश्वासने देऊन यंत्रमागधारकांच्या तोंडाला पाने पुसली. तसेच यंत्रमाग धंद्याच्या ऊर्जितावस्थेसाठी पूर्वी असलेले अनुदानाचे कोणतेही पॅकेज (मराठवाडा वगळता) देण्याचा विचारसुद्धा केला नाही. अशा परिस्थितीत गेले वर्ष वस्त्रोद्योगाबरोबर यंत्रमाग व्यावसायिक व उद्योजकांना कमालीच्या मंदीचे गेले.
दीपावलीनंतर लग्नसराईचा हंगाम पाहता कापडाला मागणी येईल, अशी यंत्रमागधारकांना आशा होती. आता गत २०१५ च्या सरत्या पंधरवड्यात पॉपलीन, केंब्रिक, धोती अशा वस्त्रांना मागणी आली. मागणीचा जोर नसला तरी विविध प्रकारच्या कापडाचे घाऊक भाव १ ते १.५० रुपयांनी वधारले; पण त्यापाठोपाठ झालेल्या सुताच्या दरवाढीमुळे कापड उत्पादक यंत्रमागधारक व व्यापाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यंत्रमागधारकांची आर्थिक गरज लक्षात घेऊन अडते व्यापारी भाव पाडून कापडाची मागणी करीत आहेत.

सुताची भाववाढ
इचलकरंजीत ओपन एंड, कोर्सर, फाईन आणि सुपर फाईन अशा प्रकारचे सूत कमी-जास्त प्रमाणात लागते. गेल्या पंधरवड्यात त्यापैकी ३२ नंबर, ३४ नंबर या सुताच्या भावात प्रति किलोमागे १० ते १५ रुपये वाढ झाली. तसेच ४०, ४२ व ४४ नंबरच्या सुतात १८ ते २० रुपये, ६० व ६४ नंबरच्या सुतात ४० ते ४५ रुपये आणि ८० ते १२० नंबरच्या सुतात २० ते २५ रुपये वाढ झाली.



सूत गोदामांवर छापे घालावेत
सुताचे भाव दिवसातून दोन-तीनवेळा बदलत आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योगात अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. सुताची आवक घटविण्यात आल्याने सुताची कृत्रिम टंचाई केली जात आहे. याला साठेबाजी आणि सट्टेबाजी जबाबदार आहे. सरकारने या परिस्थितीत हस्तक्षेप करून व्यापारी व बड्या दलालांच्या गोदामांवर छापे घालून सध्याच्या अस्थिरतेवर नियंत्रण मिळवावे. ज्यामुळे वस्त्रोद्योगातील परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी व्यक्त केली.


कापसाच्या भावात वाढ
वस्त्रोद्योगातील मंदीच्या स्थितीमुळे गेले नऊ महिने सूतगिरण्यांना तोटा सहन करावा लागत आहे. आता सुताचीही मागणी वाढली आहे. मात्र, कापसाचे भाव प्रतिखंडी एक ते दीड हजार रुपयांनी वाढल्याने सुताच्या दरातही वाढ झाली आहे.
४तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतून येणाऱ्या सुताचेही भाव चढे आहेत. गेले वर्षभर अडचणीत असणाऱ्या वस्त्रोद्योगाला आता चांगले दिवस येतील, अशी आशा चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणीचे सुनील सांगले यांनी व्यक्त केली.

Web Title: Soota betting machine hanger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.