सोनवडेकरांना रोजचाच दुष्काळ
By Admin | Updated: March 16, 2015 00:14 IST2015-03-15T23:34:00+5:302015-03-16T00:14:28+5:30
पाण्यासाठी दाहीदिशा : शेती कोरडी; संजय राऊत यांनी गाव घेतले दत्तक

सोनवडेकरांना रोजचाच दुष्काळ
प्रवीण देसाई -कोल्हापूर पिण्याच्या पाण्यासाठीच वणवण करावी लागत असल्याने जमिनीसाठी कुठले पाणी येणार? त्यामुळे पाण्याविना जमिनी कोरड्या असल्याचे चित्र शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे गावचे आहे. नोकरदारांमुळे हे गाव समृद्ध झाल्याचे दिसत आहे. ते अधिक समृद्ध होण्यासाठी येथील शंभर टक्के जमीन ओलिताखाली येण्याची गरज आहे. हे गाव शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दत्तक घेतले असून, त्यांनी याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.
बांबवडेपासून एक किलोमीटर अंतरावरील सुमारे दोन हजार लोकवस्तीचे गाव. वारकरी सांप्रदाय, काँग्रेस विचारांच्या या गावावर माजी खासदार कै. उदयसिंगराव गायकवाड व त्यानंतर माजी आमदार संजय गायकवाड यांचा प्रभाव राहिला आहे. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे राजकारणाचे किती गट-तट असले, तरी निवडणुका लागल्या की सर्वजण एकत्र येतात. जमिनी असूनही कोरडवाहू व अल्प उत्पन्नामुळे खासगी, सरकारी नोकरीचा पर्याय बहुतांश जणांनी निवडला आहे. दर दोन घरांमागे सरासरी एक माणूस हा कामानिमित्त मुंबईत आहे. स्पर्धा परीक्षेतही या गावातील तरुण चमकले आहेत. त्यांची प्रेरणा घेऊन सध्या दहाहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. त्यासाठी या गावचे सुपुत्र व मुंबई विद्यापीठातील अजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. दिलीप पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या पुढाकाराने खासदार संजय राऊत यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. केंद्र सरकारचा ‘निर्मल ग्राम पुरस्कार’ या गावाने मिळविला आहे.
प्रा. डॉ. दिलीप पाटील यांच्या माध्यमातून गावात मुंबईतील एंपथी फौंडेशनद्वारे इमारत बांधण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावरील जागा मोफत अंगणवाडीला देण्यात आली आहे, तर दुसऱ्या मजल्यावर स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर घेतले जातात. यासाठी मुंबईहून मार्गदर्शक येत असतात. या गावातच उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना आहे, परंतु या कारखान्यामुळे गावाला कोणताच फायदा झालेला नाही. ज्यांच्या जमिनी कारखान्यासाठी गेल्या, त्यांच्या कुटुंबातील लोकांना येथे नोकऱ्या मिळाल्या, पण तुटपुंज्या अन् अनियमित पगारामुळे ही नोकरी म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी अवस्था कर्मचाऱ्यांची आहे.
सोनवडे गावांतर्गत मानकरवाडी, शिंदेवाडी-जाधववाडी या वाड्या आहेत. गावात सातवीपर्यंत शाळा आहे. शाळेची इमारत जुनी असल्याने ती मोडकळीस आली आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बांबवडे, मलकापूर, वारणा येथे जावे लागते. पाण्याची कोणतीही योजना नसल्याने गावातील जवळपास ८० टक्के जमीन कोरडवाहू आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लघु नळ पाणीपुरवठा योजनेसह हातपंपाची सोय करण्यात आली आहे, परंतु सक्षम अशी योजना नसल्याने अपुरा व अस्वच्छ पाणीपुरवठा होतो. कचऱ्याची समस्या असून बांधीव गटारी नसल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहताना दिसते. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञान मिळण्यासाठी सुसज्ज ग्रंथालय व तरुणांना बळ मिळण्यासाठी कुस्तीची तालीम आहे. ती थोडी जीर्ण झाली आहे. गावात काँक्रीट, डांबरी व मुरुमीकरण असलेले सहा रस्ते आहेत. विद्यमान पंचायत समिती सदस्य विष्णू पाटील यांच्या प्रयत्नांतून ते झाले आहेत. गावाच्या पश्चिमेला तलाव असून त्याचा उपयोग जनावरे धुणे व धुणे धुण्यासाठी होतो.
गावातील एकूण भौगोलिक क्षेत्र ३८६.२१ हेक्टर आहे. जमिनीचे जिरायत क्षेत्र ३०८.४४ हेक्टर, तर बागायत क्षेत्र १९ हेक्टर इतके आहे. येथे अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. येथे भात, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, मिरची ही खरीप पिके तर रब्बी ज्वारी,गहू, हरभरा व ऊस ही उन्हाळी पिके अशी येथील पीकपद्धती आहे. गावात कुलदैवत निनाईदेवीसह महादेव मंदिर, मारुती मंदिर, बिरोबा मंदिर अशी प्रार्थनास्थळे आहेत. जयंती, उत्सव कार्यक्रम सामाजिक एकोप्याने मोठ्या उत्साहात साजरे होतात.
शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे गाव शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दत्तक घेतले आहे. या गावाचा सद्य:स्थितीचा ‘लोकमत’ने घेतलेला ‘आॅन दि स्पॉट रिपोर्ट’
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच बंडखोर असलेल्या या गावाने कधीही अन्याय खपवून घेतला नाही. गावातील राजकारण हे निवडणुकीपुरतेच असते. इतरवेळी सर्वजण आपापले गट-तट विसरून गावविकासासाठी एकत्र येतात. आपण गेल्या तीस वर्षांपासून गावच्या राजकारणात सक्रिय असून, सर्वांना बरोबर घेऊन काम करत आलो आहे.
- विष्णू पाटील, सदस्य, पंचायत समिती, शाहूवाडी