इचलकरंजी : बोरगाव (ता. चिकोडी) येथील यश अनिल पाचंगे (वय १५, रा. कुंभार मळा) या शाळकरी मुलाने आत्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. वारंवार शाळा चुकवीत असल्याच्या कारणातून आई-वडिलांनी रागविल्याच्या कारणातून त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासांत समजले आहे. याबाबत आयजीएम रुग्णालयातून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद देण्यात आली आहे.पाचंगे कुटुंबीय बोरगाव-कर्नाटक येथे राहण्यास आहेत. अनिल यांचा मुलगा यश हा बोरगावातील शाळेत आठवीमध्ये शिक्षण घेत होता. गेल्या काही दिवसांपासून तो वारंवार शाळा चुकवीत होता. या कारणावरून वडिलांनी त्याला रागविले होते. तरीही शुक्रवारी पुन्हा त्याने शाळेला जाणार नसल्याचे सांगितल्याने आईबरोबर त्याचा वाद झाला. त्यानंतर शाळेला जातो, असे सांगून तो निघून गेला. मात्र, शाळेत न जाता तो त्याच्या घराजवळच असलेल्या त्याच्या आत्याच्या घरी गेला. तेथे दुपारी तीनच्या सुमारास आत्याच्या दोन मुली सोप्यात टीव्ही बघत बसलेल्या असताना त्याने आतील खोलीत जाऊन आढ्याला कापडाने गळफास लावून घेतला. ही घटना नातेवाइकांच्या निदर्शनास येताच त्याला सोडवून खासगी रुग्णालयात नेले. तेथून पुढील उपचारांसाठी म्हणून आयजीएममध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याची वर्दी सचिन काशिनाथ पाचंगे यांनी शिवाजीनगर पोलिसांत दिली आहे.
Kolhapur: शाळा चुकवत असल्याने वडिलांनी रागविले, मुलाने गळफास घेत जीवन संपविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 13:47 IST