कोणी सेफ्टी पिन गिळतो, कोणाच्या नाकात शेंगदाणा, गहू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:28 IST2021-09-09T04:28:17+5:302021-09-09T04:28:17+5:30
कोल्हापूर : लहान मुले काय खातील, काय करतील, याचा नेम नाही. कोणी सेफ्टी पिन गिळतो, कोण नाकात पेन्सिल, शेंगदाणा ...

कोणी सेफ्टी पिन गिळतो, कोणाच्या नाकात शेंगदाणा, गहू
कोल्हापूर : लहान मुले काय खातील, काय करतील, याचा नेम नाही. कोणी सेफ्टी पिन गिळतो, कोण नाकात पेन्सिल, शेंगदाणा घालतो, कोणी बंदा रुपया गिळतो, चुकून मोठ्या माणसांच्या औषधाच्या गोळ्या खातो... अशा कारणांमुळे जिल्ह्यात वर्षाला ६० च्यावर बालकांवर शस्त्रक्रिया केली जाते.
घरात लहान मूल असले की पालकांना त्यांच्या सुरक्षेची अधिक काळजी घ्यावी लागते. हातात आलेली प्रत्येक गोष्ट तोंडात घालतात, मग ती खेळणी असो, भांडी किंवा घरातली कोणतीही वस्तू. त्यामुळे जी बाब लहान मुलांनी तोंडात घालू नये, असे वाटते त्या त्यांच्या हाताला सहजासहजी लागू नयेत, अशा ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. अनेकदा कुटुंबातील मोठी माणसं औषधाच्या गोळ्यांचे पाकीट टेबल, भांड्यांचा रॅक, खिडकी, पायऱ्या अशा लहान मुलांच्या पटकन हाताला येणाऱ्या ठिकाणी ठेवतात. या गोळ्या अजाणतेपणी लहान मुलांच्या हातात येतात आणि ते तोंडात घालतात. मग ही गोळी कधी थायरॉईड, बीपीची किंवा एखाद्या आजारावरची असते. या गोळ्या खाल्ल्यानंतर मुलांना उलटी, जुलाब असे दुष्परिणाम दिसू लागतात. ते अधिक प्रमाणात झाले, तर मूल बेशुद्धावस्थेत जाऊ शकते. त्यामुळे त्यांनी गोळ्या खाल्ल्याचे लक्षात येताच डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवणे गरजेचे आहे.
अनेकदा लहान मुले शेंगदाणा, चिंचोका, पेन्सिल, रबर, मणी, लोखंडी नट अशा वस्तू नाकात घालतात. हे नाकात घातल्याचे लक्षात आले व ते बाहेरच्या बाजूला दिसत असेल, तर लगेच काढते. लवकर लक्षात आले नाही किंवा खूप दिवस लागले तर जखम व जंतूदोष होऊ शकतो. पिन, टाचणी, कानातले अशा टोकदार वस्तू श्वासनलिकेत किंवा अन्ननलिकेत अडकतात. ते काढण्यासाठी दुर्बिणीद्वारे मोठी शस्त्रक्रिया करावी लागते. अशा वस्तू श्वासनलिकेत गेल्यास बाळ गुदमरते. क्वचितप्रसंगी लहान मुले केस खातात, त्यांचा मोठा गोळा जठरात होतो, त्यामुळे पोटात अन्न, पाणी राहत नाही, त्यामुळे उलटी, पोटदुखी, वजन कमी होणे अशा व्याधी होतात. अशावेळी जठराची शस्त्रक्रिया करून हा गोळा काढावा लागतो.
---
सापीआरमध्ये महिन्याला ४-५ शस्त्रक्रिया
सीपीआरला दर महिन्याला अशा अनके केसेस येतात. त्यापैकी ४ ते ५ प्रकरणांमध्ये बालकांवर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. ही सुविधा मोफत केली जाते. मात्र गेल्यावर्षीपासून सीपीआर कोविड रुग्णालय झाल्याने सध्या येथे शस्त्रक्रिया होत नाहीत.
---
लहान मुलं अजाणतेपणी नको त्या वस्तू गिळतात, नाकात घालतात. या वस्तू त्यांच्या अन्ननलिकेत, श्वासनलिकेत गेल्या तर बालकांचा श्वास गुदमरतो. अशावेळी शस्त्रक्रिया करावी लागते. त्यामुळे घरात लहान मूल असेल तर त्याच्या हातात असे काही लागू नये, याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. पूर्व दक्षता हाच यावरील सर्वोत्तम उपाय आहे.
डॉ. शिवप्रसाद हिरुगडे,
बालरोग सर्जन, कोल्हापूर.
---