जिल्ह्यात अनेक चांगल्या गोष्टी केल्याचे समाधान

By Admin | Updated: April 8, 2015 23:54 IST2015-04-08T22:39:08+5:302015-04-08T23:54:22+5:30

नव्या पदामुळे राज्यभराची जबाबदारी : राजाराम माने

The solution to do many good things in the district | जिल्ह्यात अनेक चांगल्या गोष्टी केल्याचे समाधान

जिल्ह्यात अनेक चांगल्या गोष्टी केल्याचे समाधान

कोल्हापूरचे मावळते जिल्हाधिकारी राजाराम माने यांची नुकतीच पुण्यात क्रीडा व युवक संचालनालयाचे आयुक्त म्हणून बदली झाली. नवे जिल्हाधिकारी अमित सैनी आज, गुरुवारी कार्यभार स्वीकारणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मावळत्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यासाठी काय केले हे जाणून घेण्याचा प्रयत्न...
प्रश्न : जिल्हाधिकारी म्हणून तुमच्या काळात कोणत्या कामांना महत्त्व दिले?
उत्तर : जिल्हाधिकारी म्हणून सुमारे पावणेतीन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. केलेल्या कामांबद्दल मी मनापासून समाधानी आहे. नव्या पदामुळे राज्यभराची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे तिथेही नक्कीच काही चांगले करायला मिळेल, अशी आशा आणि तसे प्रयत्न नक्की असतील. येथील कार्यकाळात सातबारा संगणकीकरणाच्या कामास प्राधान्य दिले. संगणकीकरणाचे काम यापूर्वी दोन-तीन टप्प्यांत झाले होते. ही प्रक्रिया राज्यभरात १९९५ पासून सुरू आहे; परंतु तिला आता अंतिम स्वरूप आले आहे. हे काम कोल्हापुरातही चांगले झाले आहे. पहिल्या टप्प्यात गगनबावडयातील पूर्ण सातबारा नोंदी कागदावर बंद झाल्या आहेत. उर्वरित अकरा तालुक्यांचेही काम या महिन्याअखेर पूर्ण होईल. त्यामुळे हस्तलिखित सातबारा देण्याची पद्धतच बंद होईल. या प्रक्रियेमुळे सातबारा देण्यातील गैरप्रकार रोखण्यास नक्कीच मदत होईल. ते खातेदारास मिळण्याची प्रक्रिया सुलभ होईलच शिवाय एखादी व्यक्ती त्याचा सातबारा अमेरिकेत बसूनही आॅनलाईन चेक करू शकेल. तलाठ्यांनी त्यासाठी खूप कष्ट घेतले.
प्रश्न : बदल्यांबाबत तुमचे धोरण काय राहिले?
उत्तर : मी रूजू झाल्यापासून सगळ््या बदल्या आॅनलाईन केल्या. त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप ठेवला नाही, त्यामुळे जे नियमांप्रमाणे व न्यायाचे आहे, त्यानुसारच बदल्या झाल्या. त्याबद्दल कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त झाले. ही पद्धत यापुढेही चालू राहील, अशी आशा वाटते. सुरुवातीला कर्मचाऱ्यांची काही प्रमाणात याशिवाय माझ्या काळात जिल्हा परिषद, नगरपालिका व महसूल विभागांतील सुमारे एक हजारांहून जास्त विविध पदांची भरती झाली. ही भरती अत्यंत पारदर्शी व गुणवत्तेच्या आधारेच झाली. इचलकरंजी पालिकेत प्रदूषण नियंत्रण विभागात रूजू झालेली एक मुलगी व तिचे वडील नुकतेच भेटून गेले. कुणालाही न भेटता व एक रुपायाही खर्च न करता महसूल खात्यात फक्त आपल्या मेरिटवर नोकरी मिळू शकते, यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता. परंतु, तसे घडले आहे. याशिवाय कोतवाल भरती झाली. पदोन्नतीने नेमणुका दिल्या. त्यातही पारदर्शकता सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला याचे नक्कीच समाधान आहे.
प्रश्न : तुम्ही नवीन काही काम केले नाही, अशी टीका होते?
उत्तर : प्रत्येकाची काम करण्याची एक पद्धत असते. मी अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. परंतु, त्याचा गाजावाजा करत बसलो नाही कारण तो माझा स्वभाव नाही व त्याची गरजही वाटत नाही. जिल्हाधिकारी झाल्यावर दर दोन महिन्यांनी तालुक्यांना भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. माझ्याकडे प्रश्न घेऊन येणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडविण्याचाच माझा प्रयत्न राहिला. वनपर्यटनास प्राधान्य दिले. कोल्हापूर हा सह्याद्रीच्या कुशीतला जिल्हा. त्यामुळे या जिल्ह्यात ‘इको सेन्सिटिव्ह झोन’, ‘टायगर रिझर्व्ह प्रकल्प’, गायरान जमिनींचे निर्बंध येतात. माझ्या काळात जुन्या परवानगीमुळे सुरू असलेले उत्खनन सुरू राहिले; परंतु मी एकही नवीन उत्खनन होऊ दिलेले नाही. जिल्ह्यातील वनसंपदा व खाणसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी या गोष्टींचे महत्त्व फार आहे.
प्रश्न : पंचगंगा प्रदूषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढते आहे?
उत्तर : ही गोष्ट खरी आहे; परंतु जिल्हाधिकारी म्हणून माझ्या हातात जेवढे होते ते करण्याचा प्रयत्न केला. हॉटेल्स् व प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रदूषण रोखण्यासाठी ज्या गोष्टी करणे बंधनकारक होते, त्या करण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु, मला वाटते हा प्रश्न एकट्या जिल्हा प्रशासनाने सोडविण्याचा नाही. मुळात प्रदूषण हा नफेखोरीचा प्रकार आहे. जे कारखाने प्रदूषण करतात, ते प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा पैसा त्यांच्या उत्पादनांतून वसूल करतात. परंतु, प्रत्यक्षात तो वापरत नाहीत. नदी आपली आहे, हे गाव, शहर आपले आहे, अशी भावना जेव्हा लोकांत व उद्योजकांच्या मनातही निर्माण होईल, तेव्हाच या सामाजिक प्रश्नांना आळा घालता येईल. नुसती कारवाई करण्याने हे प्रश्न सुटणार नाहीत. लोकांच्या मानसिकतेशी जोडलेले हे प्रश्न आहेत.
प्रश्न : देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून कामाचा अनुभव कसा राहिला?
उत्तर : माझ्या काळात महालक्ष्मी दागिन्यांचे मूल्यांकन करून घेतले. देवस्थानच्या ठेवी ३५ कोटींवरून ६७ कोटींपर्यंत नेल्या. त्या २०० कोटींपर्यंत गेल्या पाहिजेत, असे मला वाटते, तरच त्यातून मंदिराच्या विकासासाठी काही निधी त्याच्या व्याजातून प्रतिवर्षी खर्च करणे शक्य होईल. हिंदुत्ववादी संघटनांनी देवस्थानच्या जमिनी विकल्याचा आरोप केला. परंतु, मी अध्यक्ष असतानाच्या काळात गुंठाभरही जमीन कुणाला घेऊ दिलेली नाही. माझ्यापूर्वी जे व्यवहार झाले, त्यासाठी मला कुणी जबाबदार धरू नये. या जमिनीचे रेकॉर्ड गोळा करण्याचे काम सुरू आहे. जतला १६५ देवस्थान आहेत. कोकणातही जमिनी आहेत. त्याचा व्याप मोठा आहे. त्यामुळे जतला समितीचे कार्यालय हवे असे वाटते. समितीचा स्टाफिंग पॅटर्नही निश्चित केला. भरती प्रक्रिया कशी असावी, हे देखील नियमांच्या चौकटीत आणले. अध्यक्षांशिवाय दैनंदिन कामासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, लेखाधिकारी, डेप्युटी इंजिनिअर ही पदे निर्माण व्हायला हवीत.
प्रश्न : कोणत्या कामाबद्दल अधिक समाधान आहात?
उत्तर : माझ्या काळात विधानसभा व लोकसभा निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुका चांगल्या पद्धतीने व उच्चांकी मतदान होईल अशा झाल्या. स्वत:ला समाधान वाटेल इतके चांगले हे काम झाले. ऊस आंदोलनातही चर्चा घडवून आणण्यात पुढाकार घेतला. टोलचे आंदोलन सातत्याने सुरू राहिले, तरी कायदा-सुव्यवस्था चांगली राहील, असे प्रयत्न केले. विभागीय क्रीडा संकुलाचे काम मार्गी लावले. त्यामध्ये कोणतेही तडजोड करू दिली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाचे सुमारे १८ कोटी रुपयांचे काम अंतिम टप्प्यात आहे. मूळ इमारतीच्या ढाच्याप्रमाणेच नवी इमारत व्हावी, असा माझा आग्रह राहिला. त्यामुळे मूळच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे जे सौंदर्य आहे तसेच कायम राहणार आहे, अशी अनेक चांगली कामे मार्गी लावण्यात यश आले. वारे वाहते असले आणि त्याच दिशेने गेले की काहीच अडचण येत नाही; परंतु त्याकडे तोंड करून उभे राहण्यात अडचणी जास्त असतात. परंतु, त्यामागे आपली दिशा न बदलल्याचे समाधान जास्त असते. येथून जाताना तेच समाधान माझ्या गाठीशी आहे.
- विश्वास पाटील

Web Title: The solution to do many good things in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.