रूकडी माणगाव : अक्षता पडून २४ तास व्हायच्या आतच वायुदलातील तंत्रज्ञ माणगाव येथील प्रीतम उपाध्ये यांना तत्काळ हजर राहण्याचा आदेश येताच ते कर्तव्यासाठी हजर झाले. नववधूच्या हातचा चहाही न घेता तो देश प्रथम संसार नंतर म्हणत कर्तव्य महत्त्वाचे म्हणत ते नाशिक येथे वायुदलात हजर झाले. सध्या भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या घमासानामुळे सुट्टीवर असलेल्या जवानांना कर्तव्यावर बोलावण्यात आले आहे.प्रीतम यांचा विवाह शुक्रवारी (दि. ९) कोल्हापूर येथील सृष्टी राजकुमार कोळेकर यांच्याशी झाला. दीड वाजता उभयतांवर अक्षता पडल्या. पण शनिवारी (दि. १०) सकाळी अकरा वाजता वायुदल तंत्रज्ञ विभागात हजर राहण्याचा आदेश आला.प्रीतम यांच्या विवाहामुळे घरी आनंदाचे वातावरण होते. नववधू सृष्टी घरी आल्यानंतर घरातील मंडळी, नातेवाइकांशी तिच्या अजून संवादाची सुरुवात होणार होती. विवाहानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चहाला ठेवणार तोपर्यंत वायुसेना अधिकाऱ्यांचा फोन वाजू लागला. तो फोन उचलून पतीकडे देताच काहीशा गंभीर आवाजात प्रीतम यांचा संवाद सुरू झाला आणि अधिकाऱ्यांचा मुख्यालयात तत्काळ हजर राहण्याचा आदेश आला.प्रीतम लगेच आवराआवरी करू लागताच घरातील सगळे गंभीर झाले. अंगावरील हळद आहे तशीच होती. घरातील सदस्यांना कल्पना देताच नववधू, आई, बंधू , नातेवाईक साश्रुनयनांनी प्रीतम यांना निरोप देण्याकरिता तयार झाले. हे नववधू सृष्टीच्या घरातील सदस्यांना कळताच सर्व नातेवाईक प्रीतम यांना निरोप देण्याकरिता हजर झाले. प्रीतम वायुदलात गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत आहेत. सध्या ते नाशिक येथील वायुदल तंत्रज्ञ विभागात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
शुभमंगल पार पडले अन् २४ तासच कोल्हापुरातील जवान कर्तव्यासाठी हजर झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 15:41 IST