कोल्हापूर : आई-वडिलांनी आयुष्यभर मोलमजुरी केली. त्याच मोलमजुरीमुळे मुलगा शिकला, सैन्यात भरती झाला. त्यामुळे आता कुठे आई-वडिलांची मजुरी थांबली, अठराविश्व दारिद्र्याची रेषाही पुसटसी झाली; मात्र नियतीलाच हे मान्य नसल्याने मिसाळ कुटुंबावर सोनियाचा दिन पाहण्याआधीच एकुलत्या एक मुलाला गमवण्याची वेळ आली. पडळपैकी मिसाळवाडी (ता. राधानगरी) येथील साताप्पा गोविंदा मिसाळ या सैन्यातील जवानाला रविवारी पंजाबच्या वाघा बॉर्डरवर वीरमरण आले. ते राहत असलेल्या घरी विजेच्या धक्क्याने साताप्पा यांना वीरगती प्राप्त झाली. अत्यंत मनमिळाऊ, होतकरू अन् कष्टाळू असलेला साताप्पा ४० ते ४५ उंबऱ्यांच्या मिसाळवाडीचा अत्यंत लाडका, गावातील तो पहिला सरकारी नोकरदार. त्यामुळे घरापासून हजारो किलोमीटर दूर देशाच्या सीमेवर झालेल्या त्याच्या अपघाती जाण्याने उभी मिसाळवाडी शोगसागरात बुडाली आहे. राऊतवाडी धबधब्यापासून हाकेच्या अंतरावर वसलेल्या वाडीत लहानाचा मोठा झालेल्या साताप्पाला सुरुवातीपासूनच देशसेवेत जाण्याची इच्छा होती. राधानगरीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथील भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतले. २०१९ मध्ये तो सैन्य दलात भरती झाला. सरकारी नाेकरी मिळवणारा तो गावातील पहिलाच. त्यामुळे उभ्या गावाचा त्याच्यावर मोठा जीव. त्यानेही भरती झाल्यानंतर मागे वळून पाहताना दातृत्वाची भावना नेहमी जागृत ठेवली. यातून गावातील इतर मुलांना शिक्षण व नोकरीसाठी तो वारंवार मदत करत होता.प्रशिक्षक हंडे यांनाही होता भारी अभिमानघरची परस्थिती अत्यंत बिकट असलेल्या साताप्पाने खिंडी व्हरवडेतील लक्ष्य भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतले. त्याचा प्रमाणिकपणा, शिस्त आणि खडतर सराव पाहून प्रशिक्षण लक्ष्मीकांत हंडे यांनाही त्याचा भारी अभिमान होता. ते इतरांना नेहमी त्याचा आदर्श घेण्याचा सल्ला देत असत. साताप्पाच्या जाण्याने हंडे यांनाही मोठा धक्का बसला आहे.
Kolhapur: सोनियाचा दिन आला; पण मिसाळवाडीचा लाडका साताप्पा गेला; वाघा बॉर्डरवर आले वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:53 IST