सामाजिक, व्यावसायिक हित जपणारा बागवान

By Admin | Updated: October 18, 2015 23:47 IST2015-10-18T23:21:45+5:302015-10-18T23:47:22+5:30

शहरात दोनशे वर्षांपूर्वीपासून वास्तव्य : मुली शिक्षणात आघाडीवर; पारंपरिकसह अन्य व्यवसायात शिरकाव--लोकमतसंगे जाणून घेऊ--बागवान समाज

Social and commercial interest wage horticulture | सामाजिक, व्यावसायिक हित जपणारा बागवान

सामाजिक, व्यावसायिक हित जपणारा बागवान

एम. ए. पठाण -- कोल्हापूर--आपल्या पारंपरिक व्यवसायाशी एकनिष्ठ असणाऱ्या बागवान समाजाने एकमेकांना साहाय्य करीत समाजात एकजूट कायम ठेवली आहे. या व्यवसायाबरोबर आताची पिढी शिक्षण, नोकरी, उद्योग, डॉक्टर, वकील, आदी विविध क्षेत्रांत नाव उंचावून समाजासाठी भूषणावह ठरत आहे.
बागवान समाजाला सातशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. हा समाज संपूर्ण देशात विखुरला आहे. उत्तर प्रदेशात या समाजास राईन, कुजडा, सब्बज्जी फरोश या नावाने ओळखले जाते. मुंबईत हा समाज राईन नावाने ओळखला जातो. बागवान समाजाची म्हैसूर गॅझेट, आॅल इंडिया गॅझेट, तसेच शिवकालीन इतिहासात नोंद आहे.
कोल्हापूर शहरात दोनशे वर्षांपूर्वीपासून बागवान समाजाचे अस्तित्व आहे. पूर्वी समाजातील लोक कसबा बावडा, गडमुडशिंगी, वडणगे, आदी परिसरातील शेतजमीन फाळ्यावर कसण्यासाठी घेत असत. या ठिकाणी दररोजचा लागणारा भाजीपाला, फळे, आदी पिकांचे उत्पादन घेत व शहरात येऊन त्याची विक्री करीत असत. यामुळे उत्पादन आणि विक्री असा या समाजाचा व्यवसाय होता. आज काळाच्या ओघात शेती उत्पादन जाऊन फक्त भाजी, फळभाज्या, फळे या उत्पादनांच्या विक्रीचा व्यवसाय समाज करीत आहे. शहरातील मार्केट यार्ड येथे भाजी, फळभाज्यांच्या सौद्यासाठी बागवान समाजाच्या बांधवांची उपस्थिती असते. तसेच त्यानंतर दिवसभर या भाजी, फळभाज्यांची विक्री हा समाज करतो. शहरात आज सात हजारांहून अधिक समाजबांधव आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोमवार पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ या भागात या समाजाची संख्या अधिक आहे, तर जिल्ह्यात हा समाज सर्वसाधारण २५ हजारांपर्यंत आहे.
सर्वसाधारण १९२७ला या समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ती हुसेन बंडू बागवान, कासम चाँद बागवान, लाला आप्पाभाई बागवान, तत्कालीन रवी बँकेचे संचालक हुसैन गौबी बागवान, तत्कालीन महालक्ष्मी बँकेचे संचालक इब्राहिम हुसेन बागवान, चाँद अब्दुलकरीम बागवान, गुलाब बाबाभाई बागवान, बालम इस्माईल बागल, दादा आप्पा बागवान, एन. बी. बागवान या लोकांनी. यामुळे समाजात निरक्षरतेचे प्रमाण अधिक असतानाही समाजातील समस्या, प्रश्न या लोकांनी सोडविल्यामुळे एकता अबाधित राहिली. तसेच धार्मिक कार्यात हा समाज एकसंघ राहिला.
बागवान समाजातील मुले लवकर व्यवसायात उतरत असल्याने त्यांचे शिक्षण कमी आहे. याउलट मुलींनी शिक्षणात आघाडी घेतली आहे. व्यवसायाबरोबरच आताची पिढी शिक्षण, नोकरी, उद्योगपती, डॉक्टर, वकील, पोलीस, महसूल खाते, इंजिनिअर अशा विविध क्षेत्रांत नाव उंचावून स्थिरावताना दिसत आहे. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून अन्य समाजांशी त्यांचा दररोजचा संपर्क येतो. निरूपद्रवी, मनमिळावू स्वभावामुळे या समाजाने कोल्हापुरात आपली वेगळी ओळख जपली आहे.


समाजातर्फे विधायक उपक्रम
भोई गल्ली येथे बागवान समाजाचा मिनी हॉल आहे. हा हॉल घरगुती व सामाजिक समारंभासाठी सर्व समाजांसाठी अल्प भाड्यावर दिला जातो.
बैतूलमाल गोळा करून गरजवंतांपर्यंत पोहोचविण्याचे काम समाजबांधव
करतात. याद्वारे गरजू, गरिबांच्या विवाहप्रसंगी होणारा खर्च, औषधोपचारासाठी लागणारा खर्च केला जातो.
शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा समाजातर्फे गुणगौरव करण्यात येतो.
बागवान समाजातर्फे बागवान व्यावसायिक पतसंस्था १९९२ पासून चालवली जाते. याचे कार्यालय मार्केट यार्ड येथे आहे. या संस्थेतर्फे समाजबांधवांना व्यवसायवृद्धीसाठी कर्ज देणे, तसेच बचतीची सवय लावण्यात संस्था यशस्वी झाली आहे. भाजी व्यवसायात कार्यरत असणाऱ्या अन्य समाजातील बांधवांनाही या पतसंस्थेतर्फे सहकार्य केले जाते.
समाजातील गरजूंना ओबीसी दाखल्यांसाठी मार्गदर्शन केले जाते.


सामाजिक बांधीलकी
सामाजिक बांधीलकी जपत हणबरवाडी येथील अंध युवक संघटना राजोपाध्येनगरात कार्यरत असून, येथे २७ मुले राहतात. या संस्थेस लागणारा दररोजचा भाजीपाला समाजाचे उपाध्यक्ष फिरोज बागवान यांच्या पुढाकाराने दिला जात आहे.
तसेच समाजातील अन्य बांधवांकडून शिरोली मदरसा व उदगाव येथील मदरसा येथे भाजीपाला दिला जातो.
तसेच २00५ मध्ये आलेल्या महापुरादरम्यान हाजी आल्ताफ इलाही बागवान व समाजातील लोकांनी तीन टन गहू, दोन टन तांदूळ कुरुंदवाड येथे पूरग्रस्तांना वितरित केला होता. बोरगाव येथील अन्नछत्रास भाजीपाला पाठविला होता.


समाज संघटित करून शैक्षणिक उन्नतीसाठी प्राधान्य दिले जात आहे. यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केले जाते. तसेच समाजाच्या विकासासाठी बागवान समाज एज्युकेशन फौंडेशन कार्यरत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- फिरोजभाई बागवान, उपाध्यक्ष,
बागवान समाज

Web Title: Social and commercial interest wage horticulture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.