Maharashtra Vidhan Sabha 2019: जिल्ह्यात आतापर्यंत २९९ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 14:26 IST2019-10-05T14:23:43+5:302019-10-05T14:26:26+5:30
कोल्हापूर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी जिल्ह्यातील १० मतदारसंघांत उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

Maharashtra Vidhan Sabha 2019: जिल्ह्यात आतापर्यंत २९९ अर्ज दाखल
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी जिल्ह्यातील १० मतदारसंघांत उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी जिल्ह्यात १५० उमेदवारांनी १८७ अर्ज दाखल केले; तर आतापर्यंत २२३ जणांनी २९९ अर्ज दाखल केले. आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सुजित मिणचेकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अनिल यादव, राजेंद्र गड्यान्नावर, चंद्रकांत जाधव, आदी दिग्गजांचा यांमध्ये समावेश आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू होती. मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन करीत शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी करवीर मतदारसंघातून, तर कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून कॉँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांनी अर्ज दाखल केले.
नरके यांचा अर्ज दाखल करण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते आले होते. जिल्ह्यातील १० मतदारसंघांत सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत १५० उमेदवारांनी १८७ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. यावेळी उमेदवारांसोबत आलेल्या समर्थकांच्या गर्दीने निवडणूक कार्यालयाचे आवार फुलून गेल्याचे चित्र होते.