कुर्डूच्या माळावर टँकरमधून मळी
By Admin | Updated: February 7, 2015 01:04 IST2015-02-07T01:02:50+5:302015-02-07T01:04:51+5:30
‘प्रदूषण नियंत्रण’ची माहिती : टँकर ‘भोगावती’च्या डिस्टिलरीचा असल्याचा संशय

कुर्डूच्या माळावर टँकरमधून मळी
कोल्हापूर : कुर्डू (ता. करवीर) जवळच्या माळावर मळीमिश्रीत रसायनाचा टँकर सोडल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी निदर्शनास आले. हे टँकर भोगावती कारखान्याच्या डिस्टिलरीतून सोडल्याचा संशय आहे. ही डिस्टिलरी खासगी कंपनीतर्फे चालविण्यात येत आहे. गेल्यावेळेला सोडलेले पाणीही त्यांनीच सोडल्याचा संशय व्यक्त होत आहे.
ट्रॅक्टरद्वारे हळदी परिसरात ओतलेले रसायनमिश्रीत पाणी भोगावती नदीत मिसळल्याने हळदी (ता. करवीर) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यानजीक पाणी दूषित झाल्यामुळे गुरुवारी हजारो मासे मृत्युमुखी पडले. पाण्यावर मृत माशांचा खच लागला होता. मेलेले मासे गोळा करून नेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची झुंबड उडाली. गेल्या २२ डिसेंबरलाही असाच प्रकार झाला होता. मळीमिश्रित पाणी नक्की सोडले कुणी याचा शोध कालही लागला नव्हता म्हणून शुक्रवारी सकाळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके, उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर व पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी पुन्हा नदीकाठी जावून पाहणी केली. तेथून ते प्रदूषित पाण्याचा माग घेत चालत गेल्यावर हे पाणी कुर्डूजवळच्या माळावर सोडल्याचे लक्षात आले. ते पाणी शेतातून वाहून ओढ्यातून थेट भोगावती नदीत मिसळले. पाणी सोडलेल्या जागेपासून नदीपर्यंतचे अंतर साडेसातशे मीटर आहे. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता वाढली. मासे मरण्याचे ते महत्त्वाचे कारण असल्याचे पाहणीत आढळून आले. काल रसायनामुळे पाणी प्रदूषित झाल्याचे सांगण्यात येत होते परंतू आज तिथे मळीचा वास येत होता. त्यामुळे साखर कारखान्यातील मळीच सोडण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही मळी कोणी सोडली, त्याचे टँकर कुणाचे होते, याची माहिती ज्यांच्या शेतातून ही मळी वाहत आली, त्या शेतकऱ्यांना बोलावून घेतली जाणार असल्याचे डोके यांनी सांगितले. गेल्यावेळेला पाणी कशामुळे प्रदूषित झाले हे शेवटपर्यंत समजले नव्हते. आता त्याचे कारण स्पष्ट झाल्याने कारवाईचा मार्ग मोकळा झाल्याचे डोके यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
अहवाल प्राप्त...
गेल्या २२ डिसेंबरला जेव्हा असेच प्रदूषण झाले तेव्हा भोगावती कारखान्याच्या डिस्टिलरीतून तीन टँकर मळी बाहेर गेल्याची नोंद झाली होती परंतु ते टँकर कुठे गेले याचा शोध आतापर्यंत लागलेला नाही. त्यावेळी नदीचे प्रदूषण झाल्यावर कारखान्याच्याच काही संचालकांनी पाटबंधारे मंडळास कळवून नदीत पाणी सोडायला लावले. धरणातून नदीत पाणी सोडल्याने प्रदूषणाची तीव्रता कमी झाली. त्यामुळे त्यावेळी पाणी प्रदूषित झाले नव्हते, असा अहवाल चिपळूण च्या प्रयोगशाळेतून आला असल्याचे डोके यांनी सांगितले.
कुर्डूजवळच्या ओढ्यात मळीचा प्रचंड वास येत होता. त्याची छायाचित्रे घेतली आहेत. या पाण्याचे तीन ठिकाणचे नमुने घेतले आहेत. ते देखील तपासणीसाठी चिपळूणला पाठविण्यात येतील. अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर कडक कारवाई केली जाईल.
- एस. एस. डोके,
प्रादेशिक अधिकारी,
प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर