सहा लाख क्विंटल साखर उत्पादन
By Admin | Updated: April 10, 2015 23:40 IST2015-04-10T23:26:56+5:302015-04-10T23:40:29+5:30
नवीद मुश्रीफ : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना चाचणी हंगाम

सहा लाख क्विंटल साखर उत्पादन
कागल : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चाचणी हंगामातच चार लाख ७६ हजार ४८८ मे. टन उसाचे गाळप करून सहा लाख १५ हजार ६२५ क्विंटल साखर उत्पादन करून कारखानदारीत एक नवीन मानांकन निर्माण केले आहे. कोणत्याही तांत्रिक अडचणींशिवाय चाचणी हंगाम यशस्वी केला आहे, अशी माहिती कारखान्याचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी दिली.
ते म्हणाले, न्यायालयीन स्थगितीमुळे या कारखान्याचा पहिलाच चाचणी गळीत हंगाम एक महिना उशिरा सुरू झाला. तरीसुद्धा शेतकरी वर्ग, सभासद, ऊसतोडणी मजूर, वाहतूकदारांनी कारखान्याचे प्रवर्तक हसन मुश्रीफ साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून कारखाना सुरू होण्याची वाट पाहिली. कारखाना सुरू झाल्यानंतर गाळपक्षमता ३५०० मे. टन इतकी असताना सरासरी ४१०० मे. टन रोज उसाचे गाळप करून नवीन तंत्रज्ञानाची क्षमता सिद्ध करून दाखविली.
सरासरी साखर उतारा १२.९२ टक्के इतका मिळाला आहे. कारखान्याच्या सहवीज प्रकल्पातून २३ मेगावॅट विजेचे रोज उत्पादन झाले आहे. एक मेगावॅट वीज निर्मितीसाठी ४.९ टक्के इतक्या कमी स्टिमचा वापर झाला आहे. दि. ९ एप्रिलअखेर चार कोटी ४१ लाख ३७ हजार युनिट वीज विद्युत वितरण कंपनीला विक्री करण्यात आली आहे. आजरा आणि गडहिंग्लज साखर कारखान्यांकडून दहा हजार मे. टन बगॅस प्राप्त झाला आहे. अद्याप सहवीज प्रकल्प १५ दिवस चालणार आहे. (प्रतिनिधी)
पुढील हंगामात गाळप क्षमता ६५00 मे. टन
नवीद मुश्रीफ म्हणाले, इजॅक कंपनीने अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित असा हा साखर कारखाना उभारला आहे. हंगामकाळात हा कारखाना पाहण्यासाठी विविध मान्यवर, साखर उद्योगातील तज्ज्ञांनी कार्यस्थळाला भेट देऊन कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे. पुढील हंगामात प्रतिदिन ६००० त ६५०० मे. टन ऊस गाळपाची जबाबदारी या इजॅक कंपनीने घेतली आहे.