कोल्हापूर : येथील हॉकी स्टेडियम रस्त्यावरील ‘विश्वपंढरी’समोरील सव्वा सहा एकर जागा आमदार अशोकराव माने यांच्या सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड या संस्थेला देण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.शहराच्या मध्यभागी असलेल्या या जमीनीसाठी शहरातील अनेक संस्थांनी याआधी मागणी केली होती. परंतु महिला सहकारी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी या जागेची मागणी करण्यात आली होती. या संस्थेच्या स्थापनेतून महिला उद्योजक निर्माण होणार आहेत.रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. हा उद्देश लक्षात घेता जाहीर लिलावाशिवाय ही शासकीय जमीन रेडी रेकनरनुसार येणारी रक्कम आकारून भोगवटादार वर्ग-२ म्हणून देण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वीच निश्चित केलेल्या धोरणानुसार काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत. या जागेवर भूखंड पाडून महिला उद्योजकांना देण्याचे संस्थेचे नियोजन आहे.
सन २००८ साली या संस्थेसाठी जागा मागणी केली होती. त्यानुसार मंत्रीमंडळाने संस्थेस ही जागा मंजूर केली आहे. या महिला औद्योगिक संस्थेच्या माध्यमातून दोन हजार महिलांना रोजगार मिळणार आहे. - अशोकराव माने, आमदार, संस्थापक