सर, आमच्या अॅडमिशनचं तेवढं बघा...!
By Admin | Updated: July 4, 2016 00:30 IST2016-07-04T00:30:42+5:302016-07-04T00:30:42+5:30
प्रवेशासाठी वशिलेबाजी : दादा, भाऊंच्या मागणीने प्राचार्य हैराण; विद्यार्थी, पालकांची धावपळ

सर, आमच्या अॅडमिशनचं तेवढं बघा...!
संतोष मिठारी ल्ल कोल्हापूर
प्राधान्यक्रमातील चूक, मित्रांसमवेत शिकण्याचा हट्ट, घरापासून लांब पडणारे अंतर अशा विविध कारणांमुळे अकरावीसाठी महाविद्यालय बदलून मिळावे यासाठी विद्यार्थी, पालकांची सध्या धावपळ सुरू आहे. यासाठी ते अशा महाविद्यालय परिसरातील काही दादा, भाऊंसह शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष, संचालकांच्या माध्यमातून वशिला लावीत आहेत. या दादा, भाऊ, आदींकडून ‘सर, आमच्या अॅडमिशनचं तेवढं बघा’, ‘अॅडमिशनचे काम कराच’ अशा स्वरूपांतील मागणीमुळे प्राचार्य हैराण झाले आहे.
शहरातील अकरावीच्या प्रवेशासाठीची निवड यादी शुक्रवारी (दि. १) प्रसिद्ध झाली. यावर्षी वैयक्तिक निकालाची टक्केवारी वाढल्याने प्रवेशाचा कटआॅफ तीन ते नऊ टक्क्यांनी वाढला. यात गुणांच्या टक्केवारीची ऐंशी-नव्वदी पार केलेल्या विद्यार्थ्यांना थेटपणे त्यांनी पसंतीक्रम दिलेल्या महाविद्यालयांत प्रवेश मिळाला आहे. मात्र, ज्यांना ५५ ते ६५ टक्के गुण असून, त्यांना पसंतीनुसार महाविद्यालय मिळालेले नाही, ज्यांनी प्रवेश अर्ज भरताना चुकीचा प्राधान्यक्रम दिला आहे, ज्यांना मित्रांसमवेतच्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांचे महाविद्यालय बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडून महाविद्यालय परिसरातील काही दादा, भाऊंच्या माध्यमातून प्राचार्यांना वशिला लावला जात आहे. काहींनी थेट संबंधित महाविद्यालयाच्या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष, संचालकांकडून प्रयत्न सुरू केले आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याचा शब्द हे दादा, भाऊ देत असून, प्रवेशासाठी ते प्राचार्यांकडे आग्रह धरत आहेत. पण, निवड यादीनुसार पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमुळे प्रवेश क्षमता पूर्ण भरत असल्याने त्यांची मागणी कशी पूर्ण करावयाची, हा प्रश्न प्राचार्यांसमोर उभारला आहे.
कट-आॅफ वाढलेल्या महाविद्यालयांत गर्दी
कोल्हापूर : अकरावीचा कट-आॅफ वाढलेल्या विवेकानंद महाविद्यालय, राजाराम महाविद्यालय, न्यू कॉलेज, आदी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. यातील न्यू कॉलेजमध्ये रविवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. दिवसभरात येथे ११५ जणांनी प्रवेश निश्चित केले.
यंदा विज्ञान शाखेतील विवेकानंद महाविद्यालय व न्यू कॉलेजचा कट-आॅफ ९१.८० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यापाठोपाठ राजाराम महाविद्यालय (९१.४० टक्के), एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेज (८९.८०), महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (८८.४०), कमला कॉलेज (८७.४०), गोखले कॉलेज (८४.२०) यांचा क्रम आहे. वाणिज्य शाखेमध्ये न्यू कॉलेज (८१.८०), कमला कॉलेज (७७.६०) आणि कॉमर्स कॉलेज (७६.८०) आघाडीवर आहे. न्यू कॉलेज (७१.४०), स. म. लोहिया ज्युनिअर कॉलेज (६२.६०), महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (६१.६०) असा कट-आॅफ असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. दरम्यान, न्यू कॉलेजमधील अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया रविवारी सुरू झाली. या ठिकाणी दिवसभरात ११५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रवेश निश्चित केला.
‘आयटीआय’साठी १२५
अर्जांची निश्चिती
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज निश्चितीचा वेग गेल्या तीन दिवसांपासून वाढला आहे. रविवारी दिवसभरात १२५ विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जांची निश्चिती केली. अर्ज निश्चितीसाठी या ठिकाणी गर्दी होत आहे.
दूरध्वनी, शिफारसपत्र
दिवसाकाठी २० ते २५ जण प्रत्यक्षात भेटून प्रवेशाची मागणी करीत आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत किमान ३० ते ४० जणांचे प्रवेशासाठी शिफारस करणारे दूरध्वनी येत आहेत. प्रवेशाच्या अशा स्वरूपातील मागणीने आम्ही हैराण झालो आहोत. गुणवत्तेनुसार अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली आहे तरीही, प्रवेशासाठी या पद्धतीने होणारी मागणी त्रासदायक ठरत असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.
अकरावी प्रवेशाला शिस्त लागावी, त्यातील गैरप्रकार थांबावेत म्हणून केंद्रीय प्रक्रिया राबविली जात आहे. कुणा दादा, भाऊंच्या मागणीने घाबरून न जाता प्राचार्यांनी प्रवेश समितीच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी.
- प्रा. डॉ. क्रांतिकुमार पाटील, अध्यक्ष, प्राचार्य असोसिएशन