शिपाईच चालवतोय चंदगड भूमिअभिलेखचा कारभार
By Admin | Updated: March 9, 2015 23:57 IST2015-03-09T20:43:47+5:302015-03-09T23:57:24+5:30
अतिरिक्त कार्यभार पन्हाळा उपअधीक्षकांकडे : आठ महिन्यांंपासून अधिकाऱ्यांची प्रतीक्षा; तब्बल १३ पदे रिक्त

शिपाईच चालवतोय चंदगड भूमिअभिलेखचा कारभार
नंदकुमार ढेरे - चंदगड -येथील भूमिअभिलेख कार्यालयात आठ महिन्यांपासून उपअधीक्षक, मंजूर १६ पदांपैकी १३ पदे रिक्त आहेत. या कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार पन्हाळ््याच्या उपअधीक्षकांकडे. त्यामुळे या कार्यालयाला कोणी वालीच नसल्याने शिपाईच कार्यालय चालवीत आहे. कार्यालयाकडे आपल्या प्रलंबित कामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना या कार्यालयाकडे केवळ वायफळ फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या भूमिअभिलेख कार्यालयाकडे एकूण १६ पदे मंजूर आहेत. याठिकाणी उपअधीक्षक असलेले एन. एस. दोशी हे १६ आॅगस्ट २०१४ रोजी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून आठ महिने हे पद रिक्त आहे. निमतानदार १, भूकरमापक ३, प्रतिलिपिक १, नगर भूकरमापक लिपिक १, दुरुस्ती लिपिक १, आवक-जावक १, छाननी लिपिक १, अभिलेखापाल १, दफ्तरबंद १, शिपाई ३ व मुख्यालय सहायक १ अशी १६ पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या या कार्यालयाकडे मुख्यालय सहायक १, शिपाई १, लिपिक १, भूकरमापक १ असे ४ कर्मचारी कामावर आहेत. त्यापैकी शिरोळ तालुक्यातून चार महिन्यांपूर्वी बदलून आलेले भूकरमापक हे दोन महिन्यांपासून दीर्घ रजेवर आहेत. मुख्यालय सहायक असलेले राणे यांना कार्यालयीन मिटिंग व इतर कामांसाठी गडहिंग्लज, कोल्हापूर येथे वारंवार जावे लागत असल्याने कार्यालय चालविण्याची वेळ शिपायावर येत आहे.सध्या या कार्यालयाकडे तालुक्यातील जमीन मोजणीची ९० प्रकरणे, वारसा नोंदी, कमी-जास्त पत्रक, कब्जा, कोर्ट कमिशन, आदी कामे प्रलंबित आहेत. याशिवाय जुने ७/१२, ८ अ, वारसा नोंद, प्रॉपर्टी कार्ड यांची माहिती विचारण्यास येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या प्रचंड आहे. या सर्वांना लिपिक व शिपाई यांना तोंड द्यावे लागत आहे.या कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे डुक्करवाडी येथील रवींद्र देशपांडे, हेमंत देशपांडे या शेतकऱ्यांची डिसेंबर २०१३ मधील मोजणी अद्याप खोळंबली आहे. शेती मोकळी असल्याने शेतकरी लवकर मोजणी करून घेण्यासाठी या कार्यालयाकडे दररोज फेऱ्या मारत आहेत. मात्र, त्यांना नेहमीचीच उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार पन्हाळ््याच्या उपअधीक्षक पल्लवी शिरकोळे यांच्याकडे आहे. १५ दिवसांतून एकदाच शिरकोळी यांची या कार्यालयाला भेट होते. पन्हाळ््यावरून चंदगडला येण्यासाठी दोन वाजतात. दोन वाजता कार्यालयात आल्यानंतर फक्त सह्या करून पुन्हा लगेच त्या माघारी जातात. त्यामुळे त्यांच्याकडे कार्यभार शेतकऱ्यांच्या दृष्टीने असून नसल्यासारखा आहे. शेतकऱ्यांच्या भावना संतप्त आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी व लोकप्रतिनिधींनी रिक्त पदांबाबत वेळीच निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.
लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे
शेतकऱ्यांसह नागरिकांच्या महत्त्वाच्या कामासाठी भूमिअभिलेख कार्यालयात कर्मचारीच नाहीत ही बाब खेदजनक आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षकांनी चंदगडचा तात्पुरता कार्यभार गडहिंग्लज येथील अधिकाऱ्यांऐवजी पन्हाळा उपअधीक्षकांकडे देण्यामागचे गौडबंगाल काय आहे, हे मात्र समजले नाही.