उद्योगांना 'अच्छे दिन' येण्याचे संकेत
By Admin | Updated: June 13, 2016 00:50 IST2016-06-13T00:50:36+5:302016-06-13T00:50:59+5:30
वाहन उद्योग तेजीत : पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांना कामाच्या आॅर्डरी, नामवंत कंपन्यांच्या उत्पादनात वाढ

उद्योगांना 'अच्छे दिन' येण्याचे संकेत
सतीश पाटील-- शिरोली -जागतिक मंदीचे सावट कमी होत असून त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगविश्वाला देखील होण्याची चिन्हे आहेत. पुढील सहा महिन्यांत जिल्ह्यासह परिसरातील उद्योगांना अच्छे दिन येणार असून सध्या अनेक उद्योगांकडे कामाच्या आॅर्डर वाढत आहेत.आॅक्टोबर २०१३ पासून औद्योगिक मंदीला सुरुवात झाली होती. मंदीचे मुख्य कारण म्हणजे तयार होणाऱ्या गाड्यांची विक्री कमी झाली होती. कमी पाऊस, जागतिक पातळीवर थंडावलेली उलाढाल याचा फटका आॅटोमोबाईल क्षेत्राला बसत होता. ही परिस्थिती गेली तीन वर्षे कायम होती. जगातील मोठमोठ्या कंपन्यांना मंदीचा फटका बसला आहे, तर देशातील मोठ्या कंपन्याही यातून सुटलेल्या नाहीत. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राची इंडस्ट्रीज तर पूर्णपणे महिंद्रा, टाटा, जॉनडीअर, न्यूहॉलंड या आॅटोमोबाईल कंपन्यांवर अवलंबून आहे.
महिंद्रा कंपनीचे ४० टक्के, तर टाटा या कंपन्यांचे ३० टक्के उत्पादन कमी झाले होते, तर इतर कंपन्यांचे उत्पादनही ५० टक्केपर्यंत घटले होते. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा येथील आॅटोमोबाईल इंडस्ट्रीजवर अवलंबून असलेला फौंड्री उद्योग आणि इतर पूरक उद्योगांना मंदीची मोठी झळ पोहोचली. मार्च २०१६ नंतर मात्र मंदी कमी होऊन उत्पादन वाढत आहे. अनेक कंपन्यांना आॅर्डर वाढून आल्या आहेत. महिंद्रा कंपनीचे ४० टक्के कमी झालेले उत्पादन पुन्हा वाढले आहे. टाटा कंपनीच्या प्लँटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अडचण होती, त्यामुळे ३० टक्के उत्पादन कमी झाले होते; पण आता महिंद्रा ट्रॅक्टर आणि टाटा ट्रक प्लँटला चांगल्या आॅर्डर आहेत. तसेच हवामान खात्याने चालू वर्षी चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. परिणामी बाजारपेठ सुधारत आहे. युरोपातील इटली, जर्मनी, तुर्की या देशात निर्यात चांगली वाढली आहे. कोल्हापूरमधील बऱ्याच कंपन्यांना २०२१ पर्यंतच्या मोठ्या आॅर्डर मिळाल्या आहेत. जॉनडीअर, न्यू हॉलंड या सारख्या कंपन्यांच्या उत्पादनांना मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी सुमारे पन्नास टक्के लघु आणि मध्यम उद्योग बंद होते. परिणामी कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीला घरघर लागली होती. मंदीची झळ उद्योजकांबरोबरच कामगार वर्गालासुद्धा बसली होती. पंधरा-पंधरा दिवस कामगारांना सुटी देण्यात आल्या होत्या. कामगारांना कुटुंब चालविणे अवघड झाले होते. मंदी हटणार कधी हे कुणालाच माहीत नव्हते. अशीच परिस्थिती राहिली असती तर पश्चिम महाराष्ट्रात उद्योग होते असे म्हणण्याची वेळ आली असती; पण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून उद्योगांना काम वाढले असून एक्स्पोर्ट वाढला आहे. पुढील वर्षभरात स्थानिक उद्योग पूर्ण क्षमतेने चालतील, अशी उद्योजकांना आशा आहे.
कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग वाढण्यासाठी राज्य शासनाने सर्वांत प्रथम धोरण बदलले पाहिजे. या ठिकाणी एखादा मोठा उद्योग आणला पाहिजे. विदर्भात मिहानला टाटा आॅटोमोटिव्ह, एल अँड टीचे मोठे प्रोजेक्ट आहेत. पुणे, चाकण, कोकणात रायगड याठिकाणी नवीन कंपन्या आल्या आहेत.
मग कोल्हापूरला का नाही? व्याजदर कमी केले पाहिजेत, टॅक्समध्ये सवलती दिल्या पाहिजेत, अशी उद्योजकांची मागणी आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याकडे वेळीच लक्ष देऊन नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी उद्योजकांची मागणी आहे.