रस्त्यावर फूटपाथ व मिळकतधारकांचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:20 IST2020-12-24T04:20:55+5:302020-12-24T04:20:55+5:30
अरुंद रस्ते व अडथळे कायम अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील अनेक मुख्य रस्त्यांलगत गरज नसतानाही फूटपाथ ...

रस्त्यावर फूटपाथ व मिळकतधारकांचे अतिक्रमण
अरुंद रस्ते व अडथळे कायम
अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील अनेक मुख्य रस्त्यांलगत गरज नसतानाही फूटपाथ उभारण्यात आले आहेत. या फूटपाथांमुळे वाहतुकीत सुधारणा होण्याऐवजी बिघाडच झाल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी फूटपाथवर पथविक्रेते व वाहन पार्किंग असे अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच काही मिळकतधारकांनीही रस्त्यावरच लोखंडी जिना, पार्किंग शेड, पाणी तापविण्यासाठी चुली असे अतिक्रमण केले आहे. वर्षानुवर्षे हे अतिक्रमण कायम आहे.
शहरात राज्य शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून पंधरा कोटी ६३ लाख रुपयांचा निधी खर्चून मुख्य मार्गाच्या दुतर्फा फूटपाथ तयार करण्यात आले. मार्गक्रमण करताना वाहतुकीमुळे पादचाऱ्यांना अडथळा येऊ नये, अपघात होऊ नये, या उद्देशाने हे फूटपाथ निर्माण करण्यात आले असले तरी त्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासण्यात आला. अनेक ठिकाणी फूटपाथसमोर पथविक्रेत्यांनी अतिक्रमण केले, तर गाळेधारकांसमोर असलेल्या फूटपाथवर मोटारसायकलींचे पार्किंग सुरू झाले. काही ठिकाणी मुख्य मार्गाला फूटपाथच अडथळा ठरला. तसेच फूटपाथच्या बाहेर वाहनांचे पार्किंग होऊ लागल्याने वाहतुकीसाठी चिंचोळा मार्ग राहू लागला. त्यातून अपघातास निमंत्रण मिळू लागले.
याकडे नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक होते. अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत वेळोवेळी कारवाई करत फूटपाथवरील अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे. परंतु अतिक्रमण विभागाकडून जुजबी कारवाईव्यतिरिक्त ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.
त्याचबरोबर शहरातील अनेक मिळकतधारकांनी गटारीबाहेर रस्त्यावर वरील मजल्यावर जाण्यासाठी लोखंडी व काहींनी कॉंक्रीटचे जिने बसविले आहेत. काहींनी कार पार्किंगसाठी शेड उभारली, अनेकांनी पाणी तापविण्यासाठी दारात रस्त्यावर चुली, बंब यासाठी रस्ता व्यापला. गल्लोगल्ली असे प्रकार सर्रासपणे दिसून येतात. याविरोधात गल्लीतील कोणी आवाज उठविल्यास शहरात झालेली मोठमोठी अतिक्रमणे दिसत नाहीत. फक्त हेच दिसते, असा वाद - विवाद घातला जातो. संबंधित विभागातील नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी अशा अतिक्रमणांना रोखून वेळीच अतिक्रमण काढून घेणे आवश्यक आहे. परंतु त्याकडे त्यांचे नेहमीच दुर्लक्ष असते. त्यातून अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत जाऊन आतील अनेक मार्गही चिंचोळे बनले आहेत. विभागानुसार अशा अतिक्रमणांना काढण्याची मोहीम राबवून शहराला अतिक्रमणमुक्त बनवणे गरजेचे बनले आहे.
(फोटो ओळी)
इचलकरंजीत फूटपाथावर पथविक्रेत्यांचे अतिक्रमण झाले आहे.
(छाया : उत्तम पाटील)