तळसंदेतील श्री महाविष्णू मंदिर दुर्लक्षित

By Admin | Updated: May 24, 2016 00:54 IST2016-05-24T00:17:52+5:302016-05-24T00:54:33+5:30

‘अ’ वर्ग स्थळात समावेश करा : तलावातील हजारो वर्षांचे हेमाडपंथी मंदिर नष्ट होण्याच्या मार्गावर

Shri Mahavishnu Temple in Tulsidas ignored | तळसंदेतील श्री महाविष्णू मंदिर दुर्लक्षित

तळसंदेतील श्री महाविष्णू मंदिर दुर्लक्षित

दिलीप चरणे -- नवे पारगाव --तळसंदे (ता. हातकणंगले) येथील विष्णू जलाशय गावाचं वैभव समजलं जातं. या भव्य तलावामुळे गावाला तळसंदे हे नाव मिळाले आहे. या तलावाच्या मध्यभागी निर्माण करण्यात आलेल्या श्री शेषशाही महाविष्णू मंदिराची पूर्णत: पडझड होत आली आहे. याकडे भाविक, भक्तांसह ग्रामस्थ व स्थानिक नेत्यांचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने पुराणातील हे हेमाडपंथी मंदिर नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे.
वाठार-बोरपाडळे राज्य मार्गावर तळसंदे येथील चावरे फाट्याच्या विरुद्ध दक्षिण बाजूच्या रोडवर दोन फर्लांग अंतरावर भव्य असा गावाचा तलाव आहे. या तलावाच्या मध्यभागी श्री महाविष्णू यांची शेषशाही रूपातील मूर्ती आहे. या मूर्तीच्या पायाशी भारत कन्या व कन्याकुमारी (शक्ती, आदिशक्ती) अशा दोन मूर्ती आहेत. पराशरासह अन्य अनेक ऋषिमुनींनी येथे तपश्चर्या केली आहे. मंदिराचे बांधकामच हेमाडपंथी आहे. यावरून हे मंदिर पुरातन मंदिरात मोडते. एवढा पुरावादेखील पुष्कळ आहे. तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या या मंदिरात जाण्यासाठी दगडी शिळेचा पूल होता. तो काळाच्या ओघात पडला आहे. त्याचे एक-दोन टप्पे शिल्लक आहेत. मंदिराची उत्तर व दक्षिण बाजूची पूर्ण भिंत कोसळली आहे. आतील एका बाजूचा थरच कसाबसा अजून तग धरून आहे. मूर्तीचा कालावधी लक्षात घेतला, तर कित्येक वर्षांची ही मूर्ती जीर्ण होत चालली आहे. उन्हाळ्यात तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर भाविकांना येथे जाता येते. एरवी पाणी असल्याने काही भक्त पोहत जाऊन सेवा पार पाडतात. गावातील लोक या तलावातील पाण्याचा वापर खर्चासाठी, अंघोळ व जनावरे धुण्यासाठी करतात.
तळसंदे येथील श्री महाविष्णू मंदिराचा पर्यटनस्थळ म्हणूनदेखील विकास करता येण्यासारखा आहे. तलावात नौका विहाराची सुविधा निर्माण केली तर उत्तम निसर्ग पार्कमुळे गावच्या विकासासाठी उत्त्पन्नाचे साधन होईल. मूर्तीचे संवर्धन करणे, मंदिराची पहिल्या टप्प्यात दुरुस्ती करणे, नवीन घडीव दगडाचे मंदिर पूर्वी असणाऱ्या मंदिराप्रमाणेच बांधणे, भाविकांना कायमस्वरूपी जाता यावे यासाठी पूल बांधणे, अशी अनेक कामे तातडीने हाती घेण्याची गरज आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराचे संवर्धन होण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. या देवस्थान स्थळाचा ‘अ’ वर्ग स्थळात समावेश करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

या पुराणातील प्रसिद्ध व अध्यात्मात मोठे महत्त्व असलेल्या महाविष्णू मंदिराकडे भाविक ग्रामस्थांनी सरळ दुर्लक्षच आजवर केल्याचे मंदिराच्या अवस्थेवरून जाणवते. जिल्ह्यात श्री महाविष्णूची मंदिरे फार कमी आहेत. अशातच शेषशाही मंदिरांची संख्या दुर्मीळ आहे.
पुरातत्त्व विभागाकडे ग्रामस्थांनी पाठपुरावा करून मंदिराच्या निर्मितीबाबत माहिती मिळते का? तसेच करवीर, काशी किंवा पराशर व अन्य ऋषींच्या ग्रंथांत याचा संदर्भ सापडतो का? याचीदेखील खात्री करून घ्यायला पाहिजे.

Web Title: Shri Mahavishnu Temple in Tulsidas ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.