कोल्हापूर जिल्ह्यात रेबिज लसीचा तुटवडा, सहा महिन्यांत भटक्या कुत्र्यांचा ४५ हजार जणांना चावा
By समीर देशपांडे | Updated: July 31, 2025 18:59 IST2025-07-31T18:58:24+5:302025-07-31T18:59:28+5:30
सांगलीहून मागवली लस

कोल्हापूर जिल्ह्यात रेबिज लसीचा तुटवडा, सहा महिन्यांत भटक्या कुत्र्यांचा ४५ हजार जणांना चावा
समीर देशपांडे
कोल्हापूर : एकीकडे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असताना आणि सहा महिन्यांत तब्बल ४५ हजार ९७२ जणांना चावा घेतला असताना, दुसरीकडे रेबिजची लस मात्र मिळेना, अशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. सर्वच जिल्ह्यांत कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती असून, कंपन्यांकडूनच पुरवठ्यावर मर्यादा आल्याचे सांगण्यात येते.
कोल्हापूर जिल्ह्यात २०२४ मध्ये ८६ हजार ८५८ जणांना कुत्र्यासह अन्य प्राण्यांनी चावा घेतला होता. हेच प्रमाण १ जानेवारी ते ३० जून २०२५ पर्यंत ४५ हजार ९७२ इतके आहे. यातील जवळपास ९६ टक्के व्यक्तींना कुत्र्याने चावले आहे. तर, उर्वरित चार टक्क्यांमध्ये अन्य प्राणी येतात. ज्या सगळ्यांनाच कुत्रे चावले आहे, त्या सर्वांनाच रेबिजची लस द्यावीच लागते असे नाही. परंतु, चावा घेतल्यानंतर रक्तस्त्राव झाला असेल किंवा मोठी जखम झाली असेल, तर मात्र रेबिज प्रतिबंधक लस घ्यावी लागते.
जिल्ह्यातील चावा घेतलेल्या आणि ज्यांना रेबिज प्रतिबंधक लसीची गरज आहे, अशी संख्या विचारात घेता जिल्ह्यासाठी दरमहा सुमारे २५०० डोसची गरज आहे, परंतु सध्या केवळ १५०० डोस जिल्ह्यात उपलब्ध आहेत. एका रुग्णाला चार डोस द्यावे लागत असल्याने प्रत्यक्षात हे ३०० च डोस उपलब्ध असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांच्या ठिकाणी या लसीचा तुटवडा जाणवत आहे.
सांगलीहून मागवली लस
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांवर रेबिज प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवत असल्याने सध्या सांगली जिल्ह्यातून हा साठा मागवण्यात आला आहे. तेथील शासकीय रुग्णालयातून ही लस मागवण्यात आली असून, कोल्हापूर जिल्ह्याला लस उपलब्ध झाल्यानंतर सांगलीला पुन्हा त्यांचे डोस परत देण्यात येणार आहेत.
३० हजार डोस खरेदीची फाईल अंतिम टप्प्यात
रेबिज प्रतिबंधक लसीचे ३० हजार डोस खरेदी करण्यासाठीची फाइल अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच निविदा प्रक्रिया होऊन हे डाेस खरेदी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
वटवाघूळही चावते
चावा घेतलेल्या व्यक्तींपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील ९६ टक्के व्यक्तींना कुत्र्याने चावा घेतला आहे. तर मांजर, घुशी, उंदीर, कोल्हा, लांडगा, माकड आणि वटवाघळाने चावल्याच्याही घटना घडल्या आहेत.
एकूण ३५ जणांचा मृत्यू
गेल्या ११ वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात श्वानदंशाने मृत्यू झालेल्यांची संख्या ३५ इतकी नोंदवण्यात आली आहे. यामध्ये दोघे अन्य राज्यांतील, दोघे अन्य जिल्ह्यांतील आणि उर्वरित जिल्ह्यातील आहेत.
गेल्या सहा महिन्यांतील श्वानदंश
- जानेवारी - ८,२३०
- फेब्रुवारी - ७,४५३
- मार्च - ८,१११
- एप्रिल - ७,२८०
- मे - ७,९७५
- जून - ६,९२३
युद्धपातळीवर लस मिळवण्याची गरज
एकीकडे कुत्रे चावण्याच्या घटना घडत आहेत आणि दुसरीकडे लस मिळेना, अशी स्थिती आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने यामध्ये लक्ष घालून लस उपलब्ध करून देण्यासाठी सूचना देण्याची गरज आहे.