कुरुंदवाडमधील दुकानगाळे वादात

By Admin | Updated: September 23, 2016 00:37 IST2016-09-23T00:02:51+5:302016-09-23T00:37:11+5:30

जिल्हा परिषदेची जागा असल्याचा आरोप : बांधकाम हटविण्याची नगरपालिकेला नोटीस; गाळेधारक ‘आंदोलन अंकुश’च्या रडारवर

Shops in Kurundwad dispute | कुरुंदवाडमधील दुकानगाळे वादात

कुरुंदवाडमधील दुकानगाळे वादात

गणपती कोळी-- कुरुंदवाड
येथील माळभागावरील जिल्हा परिषद हद्दीत नगरपालिका शहरातील व्यावसायिकांना दुकानगाळे बांधून देत आहे. मात्र, पालिका व्यावसायिकांना बेकायदेशीर दुकानगाळे बांधून देत असल्याने ‘आंदोलन अंकुश’ने चौकशीचा ससेमीरा लावला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बेकायदेशीर बांधकाम हटविण्याची नोटीस नगरपालिकेला दिल्याने गाळेधारकांचे धाबे दणाणले असून, गाळेधारक आता आंदोलन अंकुशच्या रडारवर आहेत. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर गाळेधारकांचा प्रश्न गंभीर बनणार असल्याने राजकीय नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने नगरसेवक, आघाडी नेते शहरवासीयांना खूश करण्यासाठी व राजकीय लाभ उठविण्यासाठी विविध निर्णय घेत आहेत. शहरवासीय मागेल तो ठराव कायदेशीर बाबींचा विचार न करता पालिका सभेत मंजूर करत आहेत. शहरातील छोटे व्यावसायिक व चर्मकार समाजाने पालिकेकडे दुकानगाळ्यांची मागणी केली होती. त्यानुसार माळभागावरील एस.पी. हायस्कूललगत असलेली जागा देण्याचा ठराव जुलै महिन्याच्या विशेष सभेत करण्यात आला.
मात्र, दुकानगाळ्यांसाठी देण्यात आलेली जागा मुळात जिल्हा परिषद हद्दीत येते. त्यामुळे तेथील जागा व्यावसायिकांना न देता पालिका हद्दीत देण्याची मागणी पालिकेतील राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद सुरेश कडाळे यांनी केली होती. त्यावेळी या विषयावरून खडाजंगी होऊन बहुमताच्या जोरावर व्यावसायिकांना त्याच ठिकाणी जागा देण्याचा ठराव केला होता. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांपासून दुकानगाळे उभारण्याचे काम चालू असून, ते पूर्णत्वासही आले आहे.
सध्या या जागेत ८ बाय ६ आकाराचे ३० दुकानगाळे उभारण्यात आले असून, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ चव्हाण यांनी जिल्हा परिषद हद्दीत नगरपालिकेने दुकानगाळे बांधल्याने ‘आंदोलन अंकुश’ला सोबत घेऊन चौकशी लावली आहे. आंदोलन अंकुश ही सामाजिक संघटना असून, एखादा विषय घेतला तर त्याची पूर्ण निर्गत लावल्याशिवाय शांत होत नाही. शिवाय कोणत्याही आमिषाला बळी न पडणारी संघटना अशी प्रतिमा निर्माण केल्याने अधिकारी, लोकप्रतिनिधींमध्ये या संघटनेचा मोठा दबदबा आहे.


गाळेधारकांचा प्रश्न गंभीर बनणार
‘आंदोलन अंकुश’ संघटनेने या बेकायदेशीर कामाची चौकशी लावल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाने नगरपालिकेला लेखी नोटीस देऊन जिल्हा परिषद हद्दीत बांधलेले दुकानगाळे काढून घेण्यास सांगितल्याने गाळेधारकांत खळबळ उडाली आहे.
पालिका निवडणूक कधीही जाहीर होणार असल्याने निवडणुकीच्या तोंडावरच गाळेधारकांचा प्रश्न गंभीर बनणार असल्याने नगरसेवक, आघाडी नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Web Title: Shops in Kurundwad dispute